घरखर्च भागविताना मजुरवर्गाची कसरत
नाशिक : पेट्रोलपेक्षाही खाद्य तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाढत्या महागाईमुळे हातावर पोट असणाऱ्या मजूरवर्गाला घरखर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शासनाने महागाई कमी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच औषधोपचार
नाशिक : वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहरातील रुग्णालयांमध्ये बेड मिळणे मुश्कील झाले असून, अनेक नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी पर्यायी मार्गाचा शोध सुरु केला आहे. यामुळे काही डॉक्टरांच्या दवाखान्यातही गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक रुग्ण डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच औषधोपचार घेत असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला
नाशिक : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयासह महापालिकेचे सर्व दवाखाने आणि ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झालेले आहेत. यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना सुट्या मिळणे मुश्कील झाले आहे. काहींना तर सलग ड्युटी करण्याचीही वेळ येत आहे.
शेतकऱ्यांची कांदा काढण्याची लगबग
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उन्हाळी कांदा काढण्याची लगबग सुरु झाली आहे. लेट खरीप कांद्याची काढणी जवळपास आटोपत आली आहे. बदलत्या वातावरणामुळे कांदा लवकरात लवकर काढून तो चाळीत सुरक्षित ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. लाल कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत
नाशिक : मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. भाजीपाला पिकांना या वातावरणात फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना पिकांवर औषध फवारणी करावी लागत आहे. यामुळे खर्च वाढला आहे.
रस्त्यावरील गर्दी कायम
नाशिक : शहरातील बाजारपेठा बंद असल्या तरी रस्त्यांवरील गर्दी मात्र कमी झालेली नाही. अनेक नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिक मास्क न लावताच गर्दीमध्ये वावरतात. गर्दीमुळे फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
उपनगर येथील आंबेडकर वाचनालयात चाचणीकेंद्र
नाशिक : उपनगर येथील मनपा शाळेत सुरु असलेले कोरोना चाचणी केंद्र डॉ. बाबासाहेब वाचनालय, महाराष्ट्र हायस्कूलमागे, साईबाबा मार्केट येथे सुरु करण्यात आले आहे. मनपा शाळेजवळच असलेली दाट लोकवस्ती आणि मार्केट परिसर यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.