नाशिक : गतवर्षी जेव्हा रुग्णालये ओसंडून वाहू लागली, त्यावेळी मनपा हद्दीत सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरच्या शुभारंभाचे भव्य सोहळे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले होते. मात्र, आता त्यातील बहुतांश मान्यवर कोरोनाच्या संकटातून स्वत: गेल्याने शासन, प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा कोविड सेंटर्सच्या उद्घाटनाचे सोहळे टाळले. ही उपरती उशिराने का होईना झाली, हेही नसे थोडके, अशीच चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
गतवर्षी कोविड सेंटरच्या उद्घाटनांना जुलै महिन्यातच प्रारंभ झाला. त्यावेळी प्रत्येक मनपा कोविड सेंटर, तसेच ठक्कर डोमच्या उद्घाटनांचे सोहळे अगदी साग्रसंगीत झाले होते. संबंधित केंद्रातील डॉक्टर्स, कर्मचारी, पदाधिकारी, मान्यवर, उत्सवमूर्ती, पत्रकार, छायाचित्रकार, असा सर्व लवाजमा बरोबर ठेवून भाषणबाजी करून फोटोसेशन करून त्या कोविड सेंटर्सचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या कोविड सेंटरच्या प्रारंभासाठी आपण कशा प्रकारे प्रयास केले, ते सांगून त्यातूनही क्रेडिट मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरच्या गत नऊ महिन्यांत बहुतांश मान्यवर, उत्सवमूर्ती, शासन, प्रशासनातील वरिष्ठांना कोराेनाने झटका दिल्यानंतरच त्यांना या आजाराचे गांभीर्य आणि त्याची तीव्रता समजली. काहींना तर कोरोनातून बरे होऊन पुन्हा रुजू होण्यासाठी सुमारे महिनाभराहून अधिक कालावधी लागला. त्यामुळेच आता शहरातील रुग्णालये ओसंडून वाहू लागल्यानंतर कोविड सेंटर मनपाच्या वतीने सुरू करण्यात येत आहेत. मात्र, यंदा तरी या कोविड सेंटरच्या शुभारंभाचे सोहळे टाळून प्रशासनाने त्यांच्यात थोडीफार तरी माणुसकी बाकी असल्याचे दाखवून दिले आहे.