नाशिक : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला वेग आला असून आतापर्यंत पहिला आणि दुसरा डोस मिळून सुमारे सहा लाखांच्या पुढे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा वेग वाढत असल्याने पुढील दहा ते बारा दिवस पुरेल इतका लसींचा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. प्रशाासनाने केंद्राकडे लसींची मागणी नोंदविली आहे.
जिल्ह्यात दररोज कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून पहिल्या दहा कोरोना प्रादुर्भाव असलेल्या शहरांमध्ये नाशिकचा समावेश असल्याने गांभीर्य अधिक वाढले आहे. रुग्णवाढीचा वेग पाहता आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्याबरोबरच जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १२६ केंद्रांवर सुरू असलेल्या लसीकरणाची संख्या देखील वाढली आहे. लसीकरण करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत असून दररोज जवळपास दहा हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे.
सद्यपरिस्थितीत जिल्ह्यात कोव्हीशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस उपलब्ध आहे. जिल्ह्याला आतापर्यंत कोव्हीशिल्डचे ४ लाख ४७ हजार २२० तर मागील तीन महिन्यात जिल्ह्याला कोव्हॅक्सिनचे अवघे ४५ हजार ३४० डोसच उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे कोव्हीशिल्डची उपलब्धता असल्याने जास्तीत जास्त कोव्हीशिल्डचे डोस नागरिकांना दिले जात आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती झाल्याने कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. नागरिक देखील स्वयंस्फूर्तीने लसीकरण केंद्रांवर येत आहेत.
गेल्या १३ जानेवारिला जिल्ह्याला कोव्हीशिल्डचे ४३ हजार ४४० डोस प्राप्त झाले होते. त्यानंतर आता पर्यंत केंद्राकडून कोव्हीशिल्डचे ४४ लाख ७ हजार २२० डोस उपलब्ध झाले आहेत. दुसरीकडे मागील तीन महिन्यात कोव्हॅक्सिन लसीचे फक्त ४५ हजार ३४० डोसच प्राप्त झाले आहेत.
--इन्फो--
केंद्राकडे ४० लाख लसींची मागणी
जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केंद्राला मागणी पत्र पाठविले असून जिल्ह्यासाठी ४० लाख डोस उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.