नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. मेंगाळ वस्तीवर बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहे.देशवंडी येथिल महादेव नगर परिसरातील मेंगाळ वस्तीवर राहणारे बन्सी भाऊराव मेंगाळ यांच्या तीन वर्षाच्या गायीला बिबट्याने सोमवारी ( दि.५ ) पहाटे ठार केल्याची घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास अंगणात बांधलेल्या जनावरांच्या कळपावर बिबट्याने हल्ला चढवला.जनावरांच्या हंबरण्याच्या आवाजाबरोबरच कुत्र्यांच्या भुंकण्याचा जोराचा आवाज आल्याने मेंगाळ घराबाहेर आल्यानंतर सदर घटना त्यांनी पाहिली. जमिनीवर पडलेल्या गायीवर बिबट्याची झडप बघताच मेंगाळ यांनी आरडाओरडा करत शेजारच्या शेतकऱ्यांना बोलावले. माणसांची गर्दी बघताच बिबट्याने मृत गायीला सोडून डोंगराच्या दिशेने पलायन केले.सिन्नर वनविभाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.या परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्यामुळे परिसरातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी व पशुपालकांनी केली आहे.शेती कामांचा खोळंबासध्या सर्वत्र सोयाबीन काढणी बरोबरच शेतीच्या कामांची लगबग सुरू असल्यामुळे सायंकाळी उशिरा पर्यंत शेतकरी व मजुर शेतीत काम करत असतात.अशा परिस्थतीत दररोज कोणत्याना कोणत्या शिवारात बिबट्या नजरेस पडत असल्यामुळे शेतीचे कामांचा खोळंबा होत आहे.अशा परिस्थतीत कोणताही अनुचित प्रकार घडण्याच्या आधी या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहे.