पळसे नासाका कारखाना रोडवर सीताराम गोशाळा असून निलकमल रावत हे या गोशाळेचे काम बघतात. त्या ठिकाणी एकूण २३ गायींचे संगोपन केले जाते. सर्वांना गोठ्यात एका रांगेत रात्री बांधले जाते. गोशाळेतील कर्मचारी भास्कर गोधडे यांनी बुधवारी रात्री साडेनऊच्या वाजेच्या सुमारास गोठ्यामध्ये २२ गायींना नेहमीप्रमाणे बांधले आणि तहान लागल्यामुळे घरात पाणी पिण्यासाठी गेले. तितक्यात कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने गोधडे हे लागलीच बाहेर आले असता बिबट्याने जी गाय बाहेर होती त्या गायीवर बिबट्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला. गोधडे यांनी बिबट्याच्या हल्ल्यातून गाईला वाचविण्यासाठी दगडफेक केली; मात्र बिबट्या गुरगुरला आणि हल्ला केलेल्या गाईला आपल्या जबड्यात धरत ठार मारल्याचे गोधडे यांनी सांगितले. तितक्यात गोधडे यांचे मुले देखील धावून आल्याने झालेल्या आरडाओरडीमुळे बिबट्याने तेथून अंधारात धूम ठोकली. बिबट्याच्या वास्तव्यामुळे परिसरात भितीचे व घबराटीचे वातावरण पसरले आहे. या भागात पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ वाढला असून तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. बिबटे उपाशीपोटी भटकंती करत भक्ष्याची शिकार करत आहे. यामुळे दारणा नदी काठालगत पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण होताना दिसत आहे. गुरुवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करुन गायीचा पंचनामा केला. तसेच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गोशाळे जवळच पिंजरा लावला आहे.
---
फोटो आर वर २१फॉरेस्ट नावाने सेव्ह आहे.