चांदवड : तालुक्यातील नांदूरटेक येथे डोंगरानजीक शेडवस्ती येथील गोठ्यात बांधलेल्या गर्भवती गायीला रविवारी रात्री बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वडबारे व चांदवड येथील रेणुका देवी मंदिर व चंद्रेश्वर गड परिसरात बिबट्याने अनेकांना दर्शन दिल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. शेडवस्ती येथील निंबा सखाराम शिंदे यांच्या गट नंबर ९२ मध्ये शेतातील गोठ्यात पाच ते सहा गायी-म्हशी बांधलेल्या होत्या. निंबा शिंदे यांचा मुलगा ज्ञानेश्वर याने गायीचे दूध सायंकाळी काढले. दुसऱ्या दिवशी पुन्हा गायीचे दूध काढण्यासाठी गेला असता त्यास गर्भवती गाय आढळून आली नाही. त्याने परिसरात गायीचा शोध घेतला असता जवळच नाल्याजवळ झाडा झुडूपात गाय मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास ठाकरे यांना दिली. त्यांनी वनमजूर नामदेव पवार यांना घटनेची माहिती देताच ते घटनास्थळी आले व पाहणी केली. नांदूरटेक व परिसरातील ग्रामस्थांनी बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.
नांदूरटेक येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:15 AM