पंचवटी : वणी येथील सप्तशृंगी गडावरून नाशिक सीबीएसकडे दिंडोरीरोडहून येणाऱ्या बसपुढे अचानकपणे एक मोकाट गाय व दुचाकीस्वार आडवे आल्याने त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाने नियंत्रण सुटले व बस मायको दवाखान्यासमोर भर रस्त्यात उलटली. सुदैवाने बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. या अपघातात मोकाट गायीसह महिला वाहकदेखील जखमी झाल्या आहेत.चैत्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी गडावरून भाविकांची वाहतूक करण्यासाठी जादा बसेस नाशिक आगारातून सोडण्यात आल्या आहेत. सोमवारी (दि. १५) सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारास नाशिक आगाराची बस (एमएच ०४, एन ८८३२) सप्तशृंगी गडावरून नाशिककडे येत होती. सायंकाळी बस दिंडोरीरोडवरील मायको दवाखान्यासमोर असलेल्या रस्त्यावरून जात असताना दुचाकी, एक गाय आडवी आल्याने बसचालक मधुकर खेडकर (३२) यांनी ब्रेक दाबला व दुचाकी आणि गायीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या पादचारी मार्गावरून बेवारसपणे टाकून दिलेल्या जलवाहिनीच्या लोखंडी पाईपवरून घसरत विद्युत खांबाला येऊन धडकून उलटल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. काही मिनिटांतच पोलिसांचे पथकही मदतीसाठी दाखल झाले. बसमध्ये अडकलेल्या पाच ते सहा प्रवाशांना नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी बाहेर काढले.
गाय , दुचाकीस्वार आडवे आल्याने भर रस्त्यात बस उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 1:12 AM