सातपूर : मनपा प्रशासनाने सर्वसामान्यांवर लादलेली करवाढ मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी माकपच्या वतीने सातपूर विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. माकपच्या वतीने निदर्शने करण्याबरोबरच राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपा प्रशासनाने सर्व मिळकतींवर १८ टक्के करवाढ केली आहे. प्रत्यक्षात ही करवाढ ३३ टक्के झाली आहे. यापूर्वी नसलेल्या इंच इंच मालमत्तेवर व मोकळ्या जमिनींवर नव्याने करवाढ लागू करण्याचा आदेश दि. ३१ मार्चला काढण्यात आला आहे. शेतकरी, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, किरकोळ विक्रेते, उद्योजकांपासून ते बिल्डर्सपर्यंत सर्वांवर भरमसाठ करवाढ लादली आहे. नाशिककरांवरील करांचे हे अन्यायकारक आणि जाचक करांचे ओझे जनता सहन करणार नाही. ही जाचक करवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर अॅड. वसुधा कराड, सिंधू शार्दुल, तुकाराम सोनजे, कल्पना शिंदे, संजय पवार, मोहन जाधव, हिरामण टेलोरे, भिवाजी भावले, भागवत डुंबरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
करवाढीच्या विरोधात माकपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:36 AM