नाशिक : महापालिका स्थायी समितीने घरपट्टी व पाणीपट्टी दरात केलेल्या वाढीच्या निषेधार्थ माकपच्या वतीने राजीव गांधी भवनसमोर निदर्शने करण्यात आली. सामान्यांचे कंबरडे मोडणारी ही करवाढ त्वरित रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, तसेच अतिरिक्त आयुक्तांना निवेदनही देण्यात आले. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाने घरपट्टीत १८ टक्के तर पाणीपट्टीत ४० टक्के करवाढ केल्याच्या निषेधार्थ माकपचे अॅड. वसुधा कराड व अॅड. तानाजी जायभावे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना प्रस्तावित दरवाढ रद्द करण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपाच्याच मुख्यमंत्र्यांनी शहर दत्तक घेतले असताना नाशिककरांवर करवाढ लादण्यात आली आहे. सदर करवाढ ही अन्यायकारक असून स्मार्ट सिटीच्या नावाखाली ही लूट आहे. त्यामुळे महापालिकेने तत्काळ सदर करवाढ रद्द करावी अन्यथा जनजागृती करून मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे केले जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निदर्शनेप्रसंगी सीताराम ठोंबरे, श्रीधर देशपांडे, सिंधू शार्दुल, कल्पना शिंदे, दिनेश सातभाई, दगडू व्हडगर, मनीषा देशपांडे, सचिन मालेगावकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
करवाढविरोधात माकपची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 11:58 PM