नाशिक : शेतकरी, कामगार तसेच असंघटित कामगारांच्या प्रश्नांवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. यावेळी मोर्चेकऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली. सरकारने त्वरित मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.येथील बि. डी. भालेकर मैदानावरून दुपारी १ वाजता रखरखत्या उन्हात निघालेला मोर्चा शालिमार चौक, टिळकपथ, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नलवरून जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ येताच पोलिसांनी तो अडविला यावेळी जिल्हाधिकाºयांची शिष्टमंडळान भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात केंद्रीय कामगार संघटनांच्या मागणीनुसार असंघटित कामगार आशा, आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मनरेगा, ग्रामरोजगार सेवक, कंत्राटी कामगार, घंटागाडी, सफाई कामगार, अंशकालीन स्त्री परिचर यांना १८ हजार रुपये किमान वेतन द्या, भीमा कोरेगावच्या दंगलीचा कट रचणारे संभाजी भिडे यांना त्वरित अटक करा, घरकाम मोलकरीण, बांधकाम कामगार मंडळासाठी स्वतंत्र कर्मचाºयांची नेमणूक करा, घरकाम मंडळासाठी आर्थिक तरतूद करावी, महिला-मुलींवर अत्याचार करणाºयांवर कारवाई करा, नाशिक महापालिकेने शेतकरी व नागरिकांवर लागू केलेली करवाढ रद्द करा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मोर्चात कॉ. राजू देसले, अॅड. सुभाष लांडे, कॉ. तुकाराम भस्मे, स्मिता पानसरे, शांताराम वाळुंज, भास्करराव शिंदे, हिरालाल परदेशी, माणिक सूर्यवंशी, अमृत महाजन, कारभारी उगले, बन्सी सातपुते यांच्यासह नाशिक विभागातील असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शेतकरी, कामगारांच्या प्रश्नावर भाकपचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 2:04 AM