संजय पाठक, नाशिक- सध्या नाशिक जिल्ह्यात एकही आमदार नसलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक जिल्ह्यातील चार जागांसह एकूण बारा विधानसभा मतदारसंघांची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे. नाशिक जिल्ह्यातील या चार जागांपैकी 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने नाशिक जिल्ह्यातील कळवण नाशिक पश्चिम दिंडोरी आणि इगतपुरी या चार जागा मागितल्या असून या पलीकडे डहाणू आणि विक्रमगड, सोलापूर मध्य अहमदनगर येथील अकोले माजलगाव, किनवट, पाथरी या जागा देखील मागितल्या असल्याची माहिती पक्षाचे नेते डॉ. डी एल कराड यांनी दिली. भाजपाचे ज्येष्ठ नेते नरसय्य आडम आणि उदय नारकर यांच्या नेतृत्वाखाली काल माकपच्या नेत्यांनी नाना पटोले यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी ही मागणी केली.
नाशिक जिल्ह्यातील कळवण मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार असून दिंडोरी मध्ये याच गटाचे नरहरी झिरवाळ आहेत तर इगतपुरी मध्ये काँग्रेस पक्षाचे हिरामण खोसकर हे आमदार असून नाशिक पश्चिम मध्ये भाजपाच्या आमदार सीमा हिरे या प्रतिनिधित्व करीत आहेत. जिल्ह्यातील चार जागा मागितल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ने दिंडोरी लोकसभा मतदार संघात भास्कर भगरे यांची परस्पर उमेदवारी घोषित केल्याने माकपने नाराजी व्यक्त केली होती.