नाशिक - विनापरवानगी व नियमबाह्य वृक्षतोड करणाऱ्यांना मनपाने दणका दिला असून दंड न भरणाऱ्यांना नोटिसा पाठविणे सुरू केले असून अद्याप उद्यान विभागाकडे यासाठीची सव्वा दोन कोटींची दंड वसुली बाकी आहे. गत दोन वर्षात याप्रकरणी मनपाने विविध प्रकरणांमध्ये संबंधितांना नोटिसा व दंड ठोठावला आहे. त्यापैकी केवळ सुमारे ६० लाख रुपयांचा दंड वसूल झाला असून, तब्बल २ कोटी २० लाख रुपये दंडाची रक्कम थकीत आहे.
गत चार वर्षात या प्रकरणी उद्यान विभागाने तब्बल ४१९ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. २०१९ पासून आता पर्यंत मनपाच्या उद्यान विभागाच्या वतीने एकूण ४१९ गुन्हे दाखल केले आहे. यात सर्वाधिक नाशिक पूर्व विभागात १३५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर नाशिक पश्चिम विभागात ९७, नाशिकरोड विभागात ४४, सिडकोे विभागात ६०, सातपूर विभागात ४१ तर पंचवटी विभागात ४२ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. त्यात प्रमाणे २०२१ पासून दंडाची रक्कम तब्बल २ कोटी २० लाख १७ हजार ५०० रुपये येणे बाकी आहे.
जेमतेम ५९ लाख ४७ हजार ५०० रुपयांची दंड वसुली झाली आहे. दरम्यान दंड न भरणाऱ्या संबंधितांच्या मिळकतींवर हा बोजा चढवला जाणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. शहरात विनापरवानगी वृक्षतोडप्रकरणी उद्यान निरीक्षकांनी कारवाईसंदर्भात घरपट्टीवर बोजा चढवण्याबरोबर बांधकामाची परवानगी रद्द करणे किंवा पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असा नियम आहे. त्याच प्रमाणे नगररचना विभागाकडे बांधकाम करताना वृक्षतोड केल्यास किंवा वृक्षाची छाटणी केली तर त्या ठिकाणी होणार्या बांधकामाची परवानगी रद्द करण्यासाठी किंवा पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, यावर देखील चर्चा सुरू आहे.