नाशिक : सण, उत्सवाच्या काळात फटाके वाजविल्यामुळे सर्वसामान्यांना मुकाट्याने त्रास सहन करावा लागतो. भावनेचा मुद्दा पुढे करून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याने साऱ्यांचाच नाइलाज होतो आणि फटाक्यांचा कानठळ्या बसणारा आवाज रात्री उशिरापर्यंत सोसावा लागतो. परंतु आता न्यायालयाच्या आदेशाने या साऱ्या प्रकाराला चाप बसणार आहे. फटाक्यांच्या आवाजाने त्रास होत असेल तर नागरिक पोलिसांकडे तक्रार करू शकणार आहेत. विशेष म्हणजे तक्रारीनंतर पोलिसांना संबंधितांवर कारवाई करून त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. फटाक्यांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण नियमांची पायमल्ली होत असल्याची जनहित याचिका मुंबई न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवरील सुनावणी करताना उच्च न्यायालाने ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार ध्वनिप्रदूषणाचे जर कुठे उल्लंघन होत असेल तर पोलिसांच्या १०० या क्रमांकावर नागरिकांना तक्रार नोंदविता येणार आहे. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याचे नाव गोपनीय ठेवले जाणार असून तक्रारकर्त्याला तक्रार नोंदीचा क्रमांकही दिला जाणार आहे. जेणेकरून तो आपल्या तक्रारीचे पुढे काय झाले याची शहानिशा करू शकणार आहे. ज्यांना निनावी तक्रार करावयाची असेल त्याच्या तक्रारीचीदेखील दखल घेतली जाणार आहे. त्याबाबतची नोंद ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
फटाक्यांचा आवाज; डायल करा १००
By admin | Published: October 31, 2016 1:50 AM