लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : वाढदिवस म्हटला की, आधी केक हीच जणू गत तीन दशकांची परंपरा बनलेल्या समाजाने, आपल्याच बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी अनोखा सामाजिक पुढाकार घेतला जाऊ लागला आहे. विशेष म्हणजे, समाज माध्यमांवर मार्च महिन्याच्या प्रारंभापासून व्हायरल होऊ लागलेल्या आवाहनाला नागरिकही भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये आता केक कापून नव्हे, तर रसदार फळे कापून वाढदिवसांना रसदार बनविले जात आहेत.
केक कापून आणि विशेषत्वे त्यांची नासाडी करून वाया घालविण्यापेक्षा त्यापेक्षाही निम्म्या पैशात वाढदिवस साजरा करायचा आणि त्यातून बळीराजाच्या उत्पादनाला भाव मिळवून देण्यासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा हा नवीन फंडा अल्पावधीत समाजामध्ये चांगलाच फोफावू लागला आहे. शुद्धतेची खात्री नसलेली वस्तू, त्यावरील क्रीम खाण्यापेक्षा शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल, अशा पद्धतीने आपला आणि कुटुंबीयांचा वाढदिवस साजरा करण्याचा हा नवीन प्रघात समाजात अल्पावधीत रुजू लागला आहे. अगदी घरगुती वाढदिवसापासून राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या समारंभापर्यंत वाढदिवस साजरे करताना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत केक कापण्याची प्रथा असल्याने वाढदिवसाच्या केकची बाजारपेठ कैक हजार कोटींची झाली आहे. बहुतांश केक तीनशे रुपयांपासून ते अगदी दहा हजारांपर्यंतचे माणसाच्या उंचीइतके केक आणण्याची जणू प्रथच रूढ झाली होती. त्यातही केक कापल्यावर त्यातील आधी थोडा एकमेकांच्या तोंडाला फासायचा आणि उरलाच तर थोडा फार खायचा, अशी जणू पद्धतच रूढ झाली होती. ती या अनोख्या पुढाकाराने काही प्रमाणात तरी कमी होऊ शकणार आहे.
इन्फो
फळांची आकर्षक आरास
मोसमात उपलब्ध असणाऱ्या तीन-चार प्रकारच्या वेगवेगळ्या फळांची आरास वाढदिवस असलेल्या व्यक्तीसमोर मांडून ती फळे कापण्याची, तसेच संबंधित व्यक्ती जेवायला बसणार असलेल्या ताटाभोवतीही फळांची आकर्षक महिरपरूपी सजावट करून वाढदिवस साजरे केले जाऊ लागले आहेत.
इन्फो
सामाजिक भान राखल्याचे समाधान
केक कापण्यापेक्षा फळे कापून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना अत्यंत समर्पक आणि जास्त पौष्टिक असल्याचे समाजातील अनेकांना पटू लागले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते आजोबांपर्यंत, लग्नाचे वाढदिवस ते कंपनीतील सेलिब्रेशन थाटामाटात साजरा करताना, सामाजिक भान राखत असल्याचे समाधान मिळत असल्याने वाढदिवसाच्या आनंदाला समाधानाची जोड लाभत आहे.