नाशिक- कोरोनामुळे निर्माण झालेल्या अर्थसंकटांनतर रोजगारासाठी शहरात महिलांनी वेगवेगवळे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांना चांगली जागा देण्यासाठी महापालिकेच्या वतीने खास महिला व्यवसायिकांसाठी मार्केट तयार करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या नवनिर्वाचीत सभापती स्वाती भामरे यांनी दिली.
प्रश्न-महापालिकेची महिला व बालकल्याण समिती ही महत्वाची आहे, मात्र या समितीकडून अपेक्षीत काम होताना दिसत नाही.
भामरे- प्रशासनाकडून समितीची उपेक्षा होत असली तरी पाठपुरावा करून कामे करावी लागणार आहेत. मनपाच्या एकुण वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी समितीसाठी राखीव ठेवावा लागतो. मात्र, हा निधी उपलब्ध होतोच असे नाही. त्यामुळे तो मिळाला पाहिजे, त्याच बरोबर केंद्र आणि राज्य सरकारच्या महिलांसाठी असलेल्या योजनांचा निधी मिळवण्यावर भर राहणार आहे.
प्रश्न- अंगणवाडी सेविकांच्या अनेक समस्या आहेत.
भामरे-अंगणवाडी हा शहरी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी महत्वाचा घटक आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांना त्या दृष्टीने प्रशिक्षण दिले पाहिजे, सकस आहारातही बदल केले पाहिजेत. अंगणवाडी सेविकांच्या मोठ्या प्रमाणात समस्या असून त्या समितीच्या माध्यमातून चर्चेस घेणार आहे.
प्रश्न- महिला प्रशिक्षणाचा विषय वादग्रस्त ठरतेा.भामरे- महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून प्रशिक्षण देताना महिलांना काय रोजगार हवा आहे, त्यावर भर दिला जाणार आहे. म्हणजेच काळानुरूप प्रशिक्षण देण्यावर भर असेल. अकारण खर्च होऊन प्रशिक्षण वादग्रस्त होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.