महिला सक्षमीकरणातूनच सक्षम समाजाची निर्मितीसोनांबे : आरोग्य उपकेंद्रातर्फे आयोजित मेळाव्यातील विचार सोनांबे : महिला सक्षम झाल्या तर कुटुंब आणि पर्यायाने सर्व समाजच सक्षम होईल. शासन महिला सक्षमीकरणासाठी अनेक उपक्रम राबवित असून, महिलांनी त्यांचा लाभ घेत सक्षम व सामर्थ्यशाली समाजनिर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन पांढुर्ली आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक नारायण पाबळे यांनी केले. सोनांबे येथील आरोग्य उपकेंद्राच्या वतीने आयोजित महिला सक्षमीकरण मेळाव्यात ते बोलत होते. सरपंच पुष्पा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य रामनाथ डावरे, जनार्दन पवार, इब्राहीम शेख, आरोग्यसेविका आशा तंवर आदि मान्यवर उपस्थित होते. ‘संघटनेतून समृद्धीकडे’ असे ब्रीद घेऊन आरोग्य विभागाकडून २४ आॅक्टोबरपासून २६ जानेवारी २०१६ पर्यंत महिला सक्षमीकरण अभियान राबविले जात आहे. महिलांना संघटित होण्यासाठी प्रोत्साहन देणे, ग्राम संघ फेडरेशनद्वारे संघटन मजबूत करणे, आरोग्य, शिक्षण, पोषण, स्वच्छता, जीवनकौशल्य याबाबत माहिती व प्रशिक्षणाद्वारे क्षमता बांधणी करणे, शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे, महिलांच्या आर्थिक, सामाजिक व सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे अशा उद्देशांनी हे अभियान राबविले जात असल्याचे पाबळे यांनी सांगितले. शासनाच्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची सोनांबे आणि परिसरात चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत असल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य डावरे यांनी समाधान व्यक्त करून कर्मचाऱ्यांचा गौरव केला. गेल्या वर्षात कार्यक्षेत्रातील गावात एकही कुपोषित माता आढळली नसून बालमृत्यूचे प्रमाणही शून्य असल्याचे आरोग्यसेविका तंवर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित गर्भवती व स्तनदा मातांना लसीकरण व मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. अंगणवाडी सेविका जिजाबाई शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. आरोग्यसेवक दिलीप खालकर यांनी आभार मानले. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मेळावा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. (वार्ताहर)
महिला सक्षमीकरणातूनच सक्षम समाजाची निर्मिती
By admin | Published: December 03, 2015 11:00 PM