नाशिक : गुरुवारी अचानक बंद पुकारून मोर्चा काढणे तसेच दगडफेक आणि चार वाहनांच्या मोडतोड प्रकरणी पोलिसांनी दोनशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यात माजी महापौर प्रकाश मते यांचाही समावेश आहे. दरम्यान, या गुन्ह्णात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या नाशिक शाखेच्या वतीने गुरुवारी नाशिक शहरासह जिल्ह्णात कोणत्याही प्रकारचा बंद पुकारण्यात आला नव्हता. केवळ डोेंगरे मैदानावर धरणे ठिय्या आंदोलन करण्यात येणार होते, परंतु ऐनवेळी अचानक भूमिका बदलून मोर्चा काढण्यात आला. तसेच ठिकठिकाणी बाजारपेठा बंद करण्यात आल्या. मेहेर येथे दगडफेक, द्वारका चौफुलीवर रास्ता रोको असे प्रकार करण्यात आले इतकेच नव्हे तर डोंगरे मैदान येथे चार मोटारींच्या काचा फोडण्यात आल्या.याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आंदोलनाचे मुख्य आयोजक असलेल्यांनाच जबाबदार धरले असून, माजी महापौर प्रकाश मते, निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत बनकर, अजय ऊर्फ मयूर निंबाळकर तसेच कपिल शिंदे यांच्यासह दोनशे जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर तरुणाईला फूस लावणे, जमावबंदी आदेशाचा भंग करून मोर्चा काढणे, दगडफेक असे अनेक आरोप आहेत. दरम्यान, या आरोपींपैकी संदीप परशराम फुगट, रा. रामवाडी, पंचवटी, मोहित प्रभाकर पवार, रा. सैंदाणे मालेगाव, गणेश बाळासाहेब झिंझुरकर रा. शनिचौक सातपूर व शैलेश प्रदीप शिंदगे रा. अशोकनगर, सातपूर यांना अटक करण्यात आली आहे.