नाशिक : नाशिकमध्येशिवसेना ठाकरे गटाच्या २४ प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील काही कार्यकर्त्यांना अटक सुद्धा होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घोटी टोलनाक्यावर आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांचा समावेश आहे. दरम्यान, नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दूर होत नाही, तोपर्यंत टोल वसुली बंद करावी, या मागणीसाठी मंगळवारी शिवसेना ठाकरे गटातर्फे घोटी टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आले होते.
महामार्ग खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत टोल घेऊ नका अशी मागणी करत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तब्बल एक तास घोटी टोलनाका बंद पाडला होता. या आंदोलनामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता.
यावेळी शिवसैनिकांनी अनेक वाहने विनाटोल सोडून दिली. वाहतूक खोळंबल्याने आंदोलक आणि वाहनधारकांमध्ये वाद झाले. अखेर राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने ३१ जुलैपर्यंत रस्ते सुस्थितीत आणले जातील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.