नाशिक : सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या तक्रारीची दखल घेत न्यायालयाने माजीमंत्री मधुकर पिचड व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने शनिवारी (दि. ४) मधुकरराव पिचड, त्यांच्या पत्नी कमलबाई, मुलगी अश्विनी पिचड या तिघा संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात न्यायालयात पिचड यांच्या सुनेने तक्रार केली आहे. त्यात पिचड कुटुंबीयांनी आपले पती किरण यांना देखील आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे, सासरे-सासू व नणंद यांनी संगनमताने आपल्या नावावर असलेल्या कंपनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून, कंपनी स्वत:च्या नावावर करून घेतली. त्यानंतर घरातून हाकलून दिल्याचे व पोलिसांकडे तक्रार केल्यास दमदाटी केल्याचेही म्हटले आहे. पिचड कुटुंबीयांची राजकीय पार्श्वभूमी व वर्चस्व तसेच आर्थिकदृष्ट्या धनाढ्य असल्यामुळे सुनेने थेट पोलीस ठाण्यात तक्रार न करता न्यायालयाकडे फिर्याद दाखल केली होती. ॲड. उमेश वालझाडे यांनी तक्रारदाराच्या वतीने न्यायालयात युक्तिवाद केला असता, मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित मधुकरराव पिचड व त्यांची पत्नी, कन्येविरुद्ध सुनेचा कौटुंबिक छळ व तिच्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.