नाशिक : पोलीस आयुक्तालयातर्फे रविवारी (दि़३०) तंबाखूमुक्त नाशिकसाठी आयोजित ‘नाइट रन’मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता़ मात्र, नाइट रनसाठी दरम्यान बदलण्यात आलेल्या वाहतूक मार्गामुळे वाहनधारक व पोलीस यांच्यात चांगलेच खटके उडाले़ कॅनडा कॉर्नर परिसरातील अहिरराव फोटो स्टुडिओजवळ पोलीस व कारचालक यांच्यातील वादानंतर सरकारवाडा पोलिसांनी महिलेसह तिघांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे़ दरम्यान, पोलिसांनी बळाचा वापर केल्याचे तसेच याचे पुरावे असलेले व्हिडीओ डिलिट करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जातो आहे़
कॅनडा कॉर्नरवर पोलिसांनी मार्ग बंद केल्याने वाहतूक कोंडी झाली होती़ यावेळी कारचालक विशाल वाणी (पाटीलनगर, सिडको) यांच्यासह कारमधील प्रांजल कोठावदे, पंकज कोठावदे व नागरिकांमधील राजू लांडे यांनी वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला़, तर नागरिकांमधील चर्चेनुसार नाइट रनच्या नावाखाली वाहतूक पोलिसांची नागरिकांवर अक्षरश: दडपशाही चालू होती़ विशेष म्हणजे कारमधील लहान मुले व महिलेसोबतही वाहतूक पोलिसांनी असभ्य वर्तन केले़ याचा जाब विचारणाºया नागरिकास बळजबरीने ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला़
पोलीस आयुक्त मैदानापासून सुरू झालेली ही नाइट रन जुना गंगापूर नाका, विद्याविकास सर्कल, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, कुलकर्णी गार्डन, टिळकवाडी सिग्नल असा मार्ग होता़ यासाठी वाहतूक मार्गात बदल करून ठिकठिकाणी बॅरिकेडिंगही व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते़ या नाइट रनमध्ये कोणत्याही प्रकारचे क्रमांक काढले जाणार नव्हते त्यामुळे काहींनी धावत व त्यानंतर चालत जाऊन हा रन पूर्ण केला़ मात्र या कालावधीत पोलिसांनी बॅरिकेडिंग करून बंद केलेल्या जुना गंगापूर नाका, कॉलेजरोड व कॅनडा कॉर्नरवर मोठी वाहतूक कोंडी झाली व नागरिकांचे हाल झाले़
दरम्यान, कॅनडा कॉर्नरवरील वाहतूक पोलिसांची दादागिरी व असभ्य वर्तन काही नागरिकांनी आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केले होते़ मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून ते डिलीट करण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे़ दरम्यान, पोलिसांनी हुज्जत झालेल्या कारमधील महिला व लहान मुलांना सुखरूप घरी पोहोचविल्याचे सांगितले आहे़