नाशिक : डिपॉझिटची रक्कम परत मिळावी यासाठी वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अर्धनग्न आंदोलन करणारे ‘आप’चे पदाधिकारी जितेंद्र भावे तसेच रुग्णाचे नातेवाईक अमोल भाऊसेठ जाधव यांच्याविरुद्ध अखेर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये अमोल जाधव यांच्या कुटुंबातील सदस्य कोविडबाधित झाल्यानंतर त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर डिपॉझिटचे दीड लाख रुपये रुग्णाच्या कुटुंबीयांना परत मिळावे यासाठी जितेंद्र भावे व अमोल जाधव यांनी वोक्हार्ट रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केले होते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर जितेंद्र भावेसह अमोल जाधव यांना पोलिसांनी चौकशीसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जितेंद्र भावे यांच्या समर्थकांसह शहरातील नागरिकांनी जमावबंदी झुगारून मुंबई नाका पोलीस ठाण्याला घेराव घालत सोशल मीडियाच्या माध्यमातून हॉस्पिटल आणि मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करीत आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनप्रकरणीही पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे हॉस्पिटलबाबत तक्रार असल्यास लेखी स्वरूपात फिर्याद देण्याचे आवाहन पोलिसांनी रुग्णांच्या नातेवाइकांना केले होते. दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनातर्फे गंगाप्रसाद यादव (रा. माघ सेक्टर, भुजबळ फार्म रोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी (दि. ३) पोलिसांनी जितेंद्र भावे व अमोल यादव यांच्या विरोधात संगनमताने हॉस्पिटलमध्ये आरडाओरड करीत स्वत:च्या अंगावरील कपडे काढून महिला कर्मचाऱ्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल, असे कृत्य केल्याचा व वैद्यकीय संस्था हिंसा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
इन्फो -
वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये २५ मे रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जितेंद्र भावे यांनी रुग्णांच्या नातेवाइकांसह स्वत:च्याही अंगावरील कपडे काढून अर्धनग्न आंदोलन केले होते. या प्रकरणात मुंबई नाका पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर शहरात रुग्णालय व पोलीस प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत जितेंद्र भावे यांना सोडून द्यावे लागले होते. मात्र, पोलिसांनी आता पुन्हा रुग्णालयाकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे जितेंद्र भावे व अमोल जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.