शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि. २६) भावे यांनी रुग्णाच्या नातेवाइकासोबत मिळून अर्धनग्न आंदोलन केले होते. हे आंदोलन सोशल मीडियावरून थेट प्रसारित करण्यात आल्याने ते चांगलेच चर्चेत आले. दरम्यान, गेल्या शनिवारी भावे हे विजन रुग्णालयात अवाजवी बिल आकारल्याची तक्रार घेऊन गेले होते.
कोरोनाबाधित दत्तात्रय पांडुरंग आटवणे यांच्यावर औषधोपचार सुरू असताना शुक्रवारी (दि. २१) ते विजन रुग्णालयत मयत झाले. यानंतर मयताचे नातेवाईक स्वप्निल आटवणे, सायली आटवणे यांच्यासह जितेंद्र भावे, सोमा कुऱ्हाडे, रोहन देशपांडे आदींनी कोविड कक्षात येऊन शनिवारी गर्दी केली. तसेच रुग्णालयाने जास्त बिलांची रक्कम आकारल्याचे सांगत रुग्णावर काय व कोणत्या प्रकारचे उपचार केले, त्याची मूळ कागदपत्रांची मागणी केली आणि रुग्णालय प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांना धमकावून दैनंदिन वैद्यकीय कामकाजात अडथळा निर्माण करत मेडिकल, रक्त तपासण्यांसाठी आलेल्या खर्चाची रक्कम न देता रुग्णालयातून निघून गेले, असे डॉक्टर विक्रांत विनोद विजन (३७, पाटील लेन, कॉलेज रोड) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित जितेंद्र भावे, स्वप्निल आटवणे, रोहन देशपांडे, सोमा कुऱ्हाडे अशा पाच लोकांवर वैद्यकीय सेवा, व्यक्ती, संस्था हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी अधिनियम २०१० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सरकारवाडा पोलिसांकडून केला जात आहे.