नाशिकरोड : दारणा नदीपात्रात पिण्याचे पाणी आवर्तन सोडले असून, पळसे भागातील सहा शेतकऱ्यांनी नदी पात्राजवळ विजेचा पंप ठेवून शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा उपसा केला म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारणा नदीपात्रात पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्याने त्या पाण्याचा वापर शेती सिंचनासाठी करू नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले होते. तरी गेल्या बुधवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत चेहेडी बंधारा ते पळसेगाव व शेवगेदारणापर्यंत दारणा नदी पात्राच्या उजव्या बाजूला सहा शेतकऱ्यांनी विजेचे पंप बसवून शेतीच्या सिंचनासाठी पाण्याचा उपसा केला. याप्रकरणी पाटबंधारे विभागाचे अभियंता अशोक कारभारी दुघड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पळसे भागातील जयवंत नाना गायधनी, विजय आत्माराम खर्जुल, सुकदेव तुकाराम गायखे, वसंत मुरलीधर धारबळे, सूर्यभान किसन गायखे व एक अज्ञात इसम अशा सहा जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
दारणातील पाणी उपसा केल्याने सहा शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: June 03, 2016 10:48 PM