-----
गिरणा धरणातून मासे चोरणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : गिरणा धरणातून १५ हजार रुपये किमतीचे १५० किलो मासे विना परवानगी चोरणाऱ्या ज्ञानेश्वर राजेंद्र भोई रा. रोंझाणे याच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अन्वर हुसेन शेख जाफर यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार के. एस. गुजर हे करीत आहेत.
-----
मालेगाव कॅम्प पाेलीस उपअधीक्षकपदी जाधव
मालेगाव : कॅम्प पोलीस उपअधीक्षकपदी प्रदीप ज्ञानेश्वर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅम्प पोलीस अधीक्षक पद रिक्त होते. गृह विभागाने ९६ निरीक्षकांना उपअधीक्षक व सहायक आयुक्त पदांवर पदोन्नतीने पदस्थापना दिली आहे. सध्या शहर व कॅम्प विभागाचा पोलीस उपअधीक्षक पद रिक्त आहे. गेल्या महिन्यात मंगेश चव्हाण यांची बदली झाल्याने कॅम्पचा पदभार ग्रामीणचे उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांचेकडे देण्यात आला होता. गृहविभागाने जाधव यांची मालेगाव कॅम्प उपअधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. जाधव हे सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. त्यांनी अजून पदभार घेतला नाही.
-----
‘माझी वसुंधरा’ची महापालिकेत शपथ
मालेगाव : महापालिकेत पर्यावरण रक्षणासाठी ‘माझी वसुंधरा हरित’ अभियानांतर्गत महापालिकेच्या सभागृहात सकाळी शपथ घेण्यात आली. यावेळी आयुक्त त्र्यंबक कासार, उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, नितीन कापडणीस, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, वैभव लोंढे, लेखापाल कमरूद्दीन शेख, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. वसुंधरा वाचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
-----
माघारीसाठी गावोगावी फिल्डिंग
मालेगाव : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ४ जानेवारीला माघारीची प्रक्रिया होणार आहे. तत्पूर्वी गावागावात माघार घेण्यासाठी रिंगणातील उमेदवारांची मनधरणी केली जात आहे. भाऊबंदकीच्या बैठका लावून फिल्डिंग लावली जात आहे.
----
संचारबंदी उल्लंघन, २२ जणांवर गुन्हा दाखल
मालेगाव : थर्टी फर्स्टला कोरोनाचे सावट व संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र, तरीही जल्लोष साजरा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहर परिसरात १३ ठिकाणी नाकाबंदी करुन निर्बंध व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच निर्धारित वेळेनंतर आस्थापना खुले ठेवणाऱ्या दोघा मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.