नाशिक : कामगारनगर येथील स्वागत हाइट या वादग्रस्त इमारतीचा पाणीपुरवठा खंडित केल्यानंतरदेखील पाणीचोरी होत असल्याचे महापालिकेच्या तपासणीत आढळले असून, याप्रकरणी थेट पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.सातपूर विभागातील सदरच्या इमारतीचा वाद गेल्या काही वर्षांपासून गाजत असून, महापालिकेतही त्याचे पडसाद उमटले आहे. इमारतीवर करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम, त्यावरून बिल्डर आणि सदनिकाधारकांचे वाद तसेच त्यांचे आपसातील वाद यामुळे हे प्रकरण न्यायालय आणि पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे. महापालिकेने या इमारतीला दि. १९ डिसेंबर २०१३ रोजी दाखला दिला. मात्र, २७ मार्च २०१८ रोजी महापालिकेच्या मुख्य अग्निशमन दल अधिकाऱ्याने या इमारतीची उंची मोजली तेव्हा ती मंजुरीपेक्षा ३५ सेंटीमीटर अधिक असल्याचे आढळून आले. त्यामुळे ही इमारत अनधिकृत ठरवून २१ आॅगस्टपासून इमारतीचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. जोपर्यंत इमारतीची उंची कमी करून सुधारित ले-आउटला मंजुरी दिली जात नाही किंवा अग्निशमन उपाययोजना केल्या जात नाही तोपर्यंत इमारतीचा पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे.महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने दि. २१ आॅगस्ट २०१८ रोजी अवैधरीत्या मनपाची परवानगी न घेताच पाणी वापर करीत असल्याचे कळल्यानंतर त्यांची जोडणी बंद करण्यात आली होती. परंतु त्यानंतर पुन्हा दि. २५ एप्रिल रोजी अधीक्षक अभियंत्याकडे पाणीपुरवठा चोरून घेतला जात असल्याची तक्रार करण्यात आली होती त्या आधारे अभियंता रवींद्र पाटील यांनी शुक्रवारी (दि. २६) तपासणी केली असता पाणीचोरी सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्या आधारे सहा हजार ९२० रुपयांचे पाणी चोरल्या प्रकरणी पाटील यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्या प्रकरणाची चौकशीस्वागत हाइट प्रकरणात महापालिकेने न्यायालयाच्या आदेशाचा एक भाग म्हणून चौकशी आरंभली होती. नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांनी यासंदर्भातील अहवाल प्रशासनाला सादर केला असून, तीन अभियंत्यांनी कामकाजात अनियमितता दाखविल्याचे त्यात म्हटले आहे. संबंधित अभियंत्यांचे यावर महापालिकेने म्हणणे मागविले असून, त्यानंतरच पुन्हा सहायक संचालकांना त्यांची उत्तरे देऊन निर्णय घेतला जाणार आहे. या प्रकरणात गरज भासल्यास महापालिका शासनाच्या नगररचना विभागाच्या सहायक संचालक प्रतिभा भदाणे यांचेदेखील मत मागविण्याच्या तयारीत आहे.
‘स्वागत हाइट््स’च्या पाणीचोरी प्रकरणी पोलिसांत गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 12:21 AM