नाशिक : शेतजमिनीत वारसा हक्क प्रस्थापित करण्यासाठी बहीण असल्याचा दावा करून जमिनीचे खोटे दस्तावेज तयार करून त्याद्वारे वृद्धाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ या प्रकरणी नाशिकचे तत्कालीन तहसीलदार, रेकॉर्ड अधिकारी यांच्यासह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आनंदवलीतील मंडलिक मळा येथील रहिवासी रमेश वाळू मंडलिक (६७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची नाशिक महानगरपालिका हद्दीतील आनंदवली शिवारात सर्व्हे नंबर २८/२/६४/१/१६९/११६ शेतजमीन आहे़ संशयित मुक्ताबाई एकनाथ मोटकरी (रा़ मोटकरी वाडी, नाशिक) या महिलेने मंडलिक यांची बहीण असल्याचा दावा करून २०१४ ते २०१५ या कालावधीत नाशिक तहसील कार्यालयात संशयित भूषण भीमराज मोटकरी, तत्कालीन तहसीलदार, तत्कालीन रेकॉर्ड अधिकारी यांना हाताशी धरून त्यांच्या मालकीच्या आनंदवली येथील शेतजमिनीचा खोटा दस्तावेज बनविला व त्याद्वारे वारसा हक्क प्रस्थापित करून मंडलिक यांची फसवणूक केली.
या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी मंडलिक यांच्या फिर्यादीवरून चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़