सिडको : काही दिवसांपूर्वीच सिडको व सातपूर भागाला जोडणाºया आयटीआय पुलाजवळ एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली होती. गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह सिडको व सातपूर भागातील गुन्हेगारीत वाढ झाली असून, पोलिसांच्या खाकीचा वचक राहिला नसल्याने खुनाचे सत्रच सुरू झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शिवसेनेच्या वतीने नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे यांनी नुकतेच पोलीस आयुक्तांना याबाबत निवेदन दिले. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डीजीपीनगर, केवळपार्क, खान बंगला परिसर, शिवशक्ती चौक, खुटवडनगर यांसह परिसरात गुन्हेगारी वाढली असून, ठिकठिकाणी टवाळखोरांचा वावर वाढला आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करून लूटमार करणे, मोबाइल तसेच गाड्यांची चोरी करणे, नागरिकांना मारहाण-दमदाटी करणे असे अनेक प्रकार घडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबरोबरच अंबड औद्योगिक वसाहतीत काम करणाºया कामगारांना मारहाण करून लूटमार करण्याचे प्रकारही नित्याचेच झाले असतानाही याकडे मात्र पोलिसांकडून गांभीयाने लक्ष दिले जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. संजीवनगर, पाटील पार्क परिसरात दोन वेळेस टपोरी मुलांनी महामंडळाच्या एसटी बसच्या काचा फोडल्या असतानाही पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. चौकाचौकात अनेक टवाळखोर बसत असून महिला व मुलींची छेड काढत असून, पोलिसांचा वचक नसल्याने गुन्हेगारही कोणालाही जुमानत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. याबरोबरच सातपूर परिसरामध्येही गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून गाड्या जाळणे, वाटसरूंना मारहाण करणे आदी प्रकार घडत असल्याने पोलिसांनी लक्ष द्यावे याबाबत शिवसेनेच्या वतीने नुकतेच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक दिलीप दातीर, भागवत आरोटे, संकेत आहेर, माधव केदारे, पंकज दातीर, शेषकुमार सिंह, स्वप्नील शिंदे आदी उपस्थित होते.
सिडको भागात गुन्हेगारीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:35 AM