शिवसेनेच्यावतीने संघटनात्मक बांधणीसाठी शिवसंपर्क अभियान शहरात राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे; मात्र सध्या कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. जेणेकरून गर्दी व जमाव एकत्र येणार नाही आणि त्यामधून कोरोनाचा प्रादुर्भाव फैलावणार नाही. याबाबत पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मनाई आदेशासह जमावबंदी, संचारबंदी आदेश लागू केले आहेत. तरीदेखील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने या नियमांचे उल्लंघन करीत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडवत मास्क न वापरता तसेच पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र आणून कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान, शहरातील वेगवेगळ्या भागात राजकीय व्यक्तींनी असे कार्यक्रम घेतल्याने शहर पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह अन्य आदेशांचा भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत.
---इन्फो--
या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
अंबड पोलीस ठाण्यात एकूण पाच, सातपूर पोलीस ठाण्यात दोन व गंगापूर पोलीस ठाण्यात एक असे एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये अनुक्रमे संशयित प्रवीण (बंटी) तिदमे, कैलास चुंबळे, चंद्रकांत पांडे, देवीदास मोहन जाधव, शांताराम कुटे, गोकूळ निगळ, योगेश गांगुर्डे, प्रवीण इंगवले, करण गायकर, प्रमोद जाधव, पवन मटाले, नितीन परदेशी, बाळा दराडे, शरद दातीर, दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, सुयश पाटील, भूषण रहाणे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.