नाशिक : शहर व परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. भरदिवसा रस्त्यावर प्राणघातक हल्ले, खून होत असले तरीही पोलिस प्रशासनाला गुन्हेगारीवर ‘अंकुश’ मिळविता येत नसेल तर जनतेचा उद्रेक रस्त्यावर दिसून येईल, असे मत जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात दोन प्राणघातक हल्ले झाले. गुन्हेगारांकडून सर्रासपणे शस्त्रे, अग्नीशस्त्रे वापरली जात असल्याने नाशिकचं जणू बिहार झालं की काय? अशी शंका येते. कोणी कौटुंबिक कारणातून द्वेषाने पोटच्या मुलीचा गळा कापून टाकतं तर कोणी पुर्व वैमनस्यातून नोकरदारा भोसकून ठार मारतं अन् शाळकरी मुलांवरही शस्त्राने वार केले जातात, यावरून नाशिकमध्ये गुन्हेगारी निश्चितच वाढली आहे. पोलिस आयुक्त जे कोणी असतील त्यांनी त्यावर नियंत्रण वेळीच मिळवावे, अन्यथा नाशिककर जनता रस्त्यावर उतरेल, असा इशाराही भुजबळ यांनी दिला.
सर्वसामान्य नाशिककरांना जगणे मुश्कील झाले आहे. शहरात भयाचे वातावरण निर्माण होत असताना पोलिस प्रशासनाकडून मात्र त्याविरोधात ठोस पावले उचलली जात नसल्याने भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भुजबळ म्हणाले, मागील काही दिवसांत शहरात दररोज हाणामाऱ्या, खून, खूनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्ह्यांसह घरफोड्या, वाहनचोरी, चेन स्नॅचिंगच्या घटनाही सुरूच आहे. गुन्हेगारीकडे अल्पवयीन मुलेदेखील वळताना दिसून येत आहे. एकीकडे गुन्हे घडत असताना दुसरीकडे मात्र त्याचा तपास करून उकल करण्यासदेखील पोलिस अपयशी ठरताना दिसत असल्याचे सांगून भुजबळांनी कायदासुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली.
‘...तर आम्ही उठाव करू’
‘नाशिकचे जे कोणी पोलिस आयुक्त आहेत, त्यांना गुन्हेगारांना आवरावं लागेल, अन्यथा नाशिकककरांच्या वतीने आम्ही उठाव करू’ अशा शब्दांत भुजबळ यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांना कठोर इशारा दिला आहे. वाढत्या गुन्हेगारीबाबत त्यांनी संताप व्यक्त करत कोणी कुठेही कोणावरही धारधार शस्त्रे चालवत आहेत, तर कोणी गोळीबार करताहेत. तरी गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नाही, असे सांगून भुजबळांनी संताप व्यक्त केला.