नाशिक - महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा वारंवार चर्चेत येतो. काही दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पोलीस आयुक्तालयाला भेट देत महिलांविषयक गुन्हेगारी व ती उघडकीस आणण्याचे प्रमाण यांचा आढावा घेतला. त्यांनी शहर पोलिसांच्या गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले असले तरीदेखील गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न अद्यापही अपुरे पडताना दिसत आहेत. निर्भया पथके सक्रिय असतानाही शहरात महिला, युवतींवर अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. अत्याचार करणारे परिचयाचे असल्याचे अनेकदा समोर येते. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे एका अल्पवयीन मुलीवर निर्जन ठिकाणी तिच्या ओळखीच्या युवकाने बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याची घटना दाेन दिवसांपूर्वीच उघडकीस आली आहे. पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी निर्भया पथके सक्रिय केली आहेत. डायल-११२ सह निर्भयाचे चार स्वतंत्र व्हॉटस्ॲप मोबाइल क्रमांकदेखील जाहीर केले आहे. यामुळे महिला, युवतींसह शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी संशयित व्यक्तींविरुद्ध त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सहा महिन्यांत २७ अत्याचार
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जानेवारीपासून जुनपर्यंत २७ बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच विनयभंग केल्याप्रकरणी ५३ गुन्हे दाखल आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांना अधिकाधिक सक्षमपणे उपाययोजना कराव्या लागणार आहेत. शाळा, महाविद्यालये आता नियमितपणे सुरू झाली आहेत. तसेच सर्व खासगी आस्थापनांसह औद्योगिक वसाहतींच्या भागातदेखील पोलिसांना गस्त वाढविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शहराजवळच्या निर्जन स्थळांवरही पोलिसांना गस्तीद्वारे ‘वॉच’ ठेवावा लागणार आहे.
विनयभंगाच्या ५४ घटना
शहर व परिसरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मागील सहा महिन्यांत विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये काही महिला, युवतींवर खासगी आस्थापनांच्या ठिकाणी नोकरी करताना, तर काहींचा पाठलाग करीत संशयितांकडून विनयभंग करण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर करीतही विनयभंग झाला आहे.
आकडेवारी
वर्ष- --- बलात्कार--- उघड
२०१७- ----- ४०-------- ४०
२०१८-------५६-------- ५४
२०१९-------५८---------५८
२०२०------ ६२---------६१
२०२१------ ७३---------७२
२०२२------२७----------२७
-----
वर्ष------ विनयभंग----उघड
२०१७--- १३२----------१२७
२०१८--- १७३----------१६७
२०१९----२०५-----------१९२
२०२०----१८३-----------१५७
२०२१-----०९६----------०९१
२०२२-----०५३---------०५०