बिटको चौकात शांती सदन इमारतीत रवि श्यामसुंदर रामनाणी यांचे ‘टेलीपॅथी कम्युनिकेशन’ नावाचे मोबाइल विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाला एकामागे एक असे दोन शटर आहेत. बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दुकानाच्या पुढून व पाठीमागील बाजूने दोन ते चार युवक दुकानाजवळ आले. त्यांनी दुकानाचे एकापाठोपाठ असलेल्या दोन्ही शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर, त्यांनी दुकानातील वायर हाताने ओढून तोडून टाकली. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपुढे अंधार दाटला. तिघा चोरट्यांनी आपल्याजवळील मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात दुकानातील सर्वात महागडे जवळपास शंभर ॲन्ड्रॉइड मोबाइल फोनसह ब्लूटूथ, हेडफोन, तीन टॅब, तीन स्मार्ट वॉच, आठ एयर बर्ड्स जोडी असा सुमारे २४ लाख ३५ हजार १०२ रुपयांचा माल पोत्यांमध्ये भरून लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चोरट्यांनी दुचाकी, रिक्षाचा वापर गुन्ह्यात केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.
श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण
दुकान मालक रवि रामनाणी यांचे काका सकाळी दुकानाजवळ आले असता, त्यांना दुकानाच्या पुढे एक फलक अस्ताव्यस्त पडलेला व शटर उघडे दिसले. त्यांनी रवि रामनाणी यांना फोनवरून माहिती कळविली. त्यानंतर, चोरीचा प्रकार उघडकीस आला. नाशिक रोड पोलिसांना माहिती समजताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली, तसेच तत्काळ श्वानपथकासह ठसेतज्ज्ञांच्या चमूला घटनास्थळी पोलिसांकडून पाचारण करण्यात आले होते.