नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात विनाकारण दुचाकीवर फिरून संचारबंदी आणि जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहरात सुमारे साडेआठ हजार नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर २ हजार २१३ वाहने जप्त करण्यात आली.देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने २३ मार्चला लॉकडाऊन जाहिर करण्यात आला होता. यामध्ये टप्प्याटप्पयाने वाढ करण्यात आली आहे. प्रारंभी याची कडक अंमलबजावणी पोलीसांकडून सुरू होती. याकाळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या होत्या. सध्या जिल्हा प्रशासनाने शिथिलता दिली असली तरी आवश्यक सेवांसाठी बाहेर पडण्यास सांगण्यात आले आहे. मात्र सर्वच दुकाने सुरू झल्याने अनेक नागरिक जीवनावश्यक वस्तुंचे कारण पुढे करत फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. यातील काही बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस अद्यापही कारवाई करीत आहेत. त्यानुसार परिमंडळ एक मधील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ५ हजार २४९ आणि परिमंडळ दोनमधील सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ३ हजार १७० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधिक १ हजार ३१३ गुन्हे सरकारवाडा पोलीस ठाणे, तर त्याखालोखाल १ हजार २८० गुन्हे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आले आहेत. अशा नागरीकांची २ हजार २१३ वाहने पोलीसांनी जप्त केली आहेत. यामध्ये सर्वाधिक २९५वाहने नाशिकरोड, त्याखालोखाल २९२ वाहने सातपूर पोलीसांनी जप्त केली आहेत. ही वाहने बॉण्डंद्वारे परत देण्यास सुरूवात केली असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगीतले.तसेच कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्वांना मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला. तरीदेखील काही नागरिक मास्क वापरत नसल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार शहरात १ हजार ५८७ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात करोनाबाबत जिल्हाधिकार्यांचा आदेश, कोरोना बरा होण्याचे चुकीचे उपाय यासह विविध अफवा सोशल मिडियावर पसरवल्या प्रकरणी ८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.