नाशिक : संचारबंदी, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणार्यांविरोधात शहर पोलिसांतर्फेगुन्हे दाखल केले जात आहेत. त्यानुसार १९ मार्च ते ३ मे या कालावधीत शहरात ४ हजार ४७५ नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच विनाकारण वाहने रस्त्यावर वाहने घेऊन मिरविणाऱ्यांची २ हजार ११६ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लॉकडाऊन जाहिर करण्यात आले. यामुळे नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या आहेत. तरीदेखील अनेक नागरिक फिरण्यासाठी, किरकोळ कामांसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांवर शहर पोलीस कारवाई करीत आहेत. पोलिसांनी १ हजार ५३९ व्यावसायिकांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच विनाकारण शहरात फिरणार्या, विनापरवानगी दुकाने सुरु करणारे, परिसरात घोळक्याने बसणारे, खेळणार्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच सोशल मीडियावरु न अफवा, दोन समाजात तेढ निर्माण करणार्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. अशा ८५३ नागरिकांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच १९ मार्च ते ३ मे या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांकडून १९ लाख ८९ हजार रु पयांचा दंड केला असून त्यापैकी ३ लाख ८१ हजार रु पयांचा दंड वसूल केला आहे.