मालेगाव : मालेगाव बाह्य मतदारसंघासाठी मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमासाठी ३३१ केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी ७३ बीएलओंनी निवडणूक यादी कामाकडे पाठ फिरविली आहे. या प्रकाराची तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी गंभीर दखल घेत संबंधित बीएलओंविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला आहे.
बुधवारी (दि.१) सायंकाळी छावणी पोलीस ठाण्यात धाव घेत कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने छायाचित्र मतदार यादी विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. मालेगाव बाह्य मतदार संघात यासाठी ३३१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत केवळ २५८ कर्मचाऱ्यांनी कामकाजाला सुरुवात केली आहे. तर ७३ कर्मचाऱ्यांनी या राष्ट्रीय कार्यक्रमाकडे सपशेल पाठ फिरविली आहे. याबाबत तहसीलदार तथा मालेगाव बाह्यचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रजित राजपूत यांनी संबंधितांना लेखी नोटीस व तोंडी सूचनादेखील दिल्या आहेत.
तरी देखील ७३ बीएलओंनी याकडे दुर्लक्ष केले. या प्रकाराची गंभीर दखल घेत तहसीलदार राजपूत यांनी बुधवारी छावणी पोलीस ठाण्यात लेखी फिर्याद दिली आहे. रात्री उशिरापर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांकडून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.