दुय्यक निबंधक कार्यालयात पोहोचले पेालीस
नाशिक : दुय्यम निबंधक कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे पुणे येथील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडे घेऊन जात असताना वाटेतच कागदपत्रांची चोरी झाल्याप्रकरणी कार्यालयातील लिपिकावर सरकारवाडा पोलिसांत संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला. अभिलेख नाट्यमयरीत्या चोरीस गेलेल्या घटनेची गेल्या दोन दिवसांपासून महानिरीक्षक कार्यालयातील अधिकारी चौकशी करीत असून मिळालेल्या माहितीनुसार, दुय्यम निबंधक कार्यालयातून आणखी तीन व्यवहारांची कागदपत्रेदेखील गहाळ झाले असल्याचे बोलले जात असल्याने शुक्रवारी पोलीस कार्यालयात येऊन धडकले.
नाशिकमधील एका व्यवहाराप्रकरणी पुण्यातील मुद्रांक महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या व्यवहाराची काही कागदपत्रे लिपिक पुणे येथे घेऊन जात असताना वाटतेच कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याचा संशयास्पद आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर पुण्यातील मुद्रांक व नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील पथकाने दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशी सुरू केली आहे. शुक्रवारी तर चौकशीसाठी पोलीस पथकही दाखल झाले आणि त्यांनी कार्यालयातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले असल्याचे समजते. दरम्यान, कार्यालयातील अभिलेख चोरीप्रकरणी नोंदणी कार्यालय क्रमांक २ मधील लिपिक सुनील पवार यास तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. जबाबातील विसंगती समेार आल्याने पवार याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
बनावट मुद्रांकाच्या आधारे देवळा येथे जमिनीचा व्यवहार झाल्याचा प्रकार समेार आल्यानंतर महसूल आणि मुद्रांक शुल्क विभागाने जिल्हाभरातील सुमारे ४० हजार दस्तांची तपासणी सुरू केली आहे. यासाठी मुद्रांक विभाागाने १२ पथकांची स्थापना केली असून अजूनही दस्त तपासणीचे काम सुरू आहे. पथकाकडून तपासणी सुरू असतानाच आता पोलिसांनी कागदपत्रे गहाळप्रकरणी चौकशी सुरू केली असून संबंधित दुय्यम निबंधक कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. या प्रकरणाचा गुंता सुटत नाही तोच अभिलेख नाट्यमयरीत्या रस्त्यातूनच गायब झाल्याची घटना घडल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
--इन्फो--
अधिवेशनातील चर्चेने प्रकरण गंभीर
कागदपत्रे गहाळप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिलेख चोरी प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केल्याने या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. बनावट दस्ताऐवज आणि मुद्रांकाच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी महानिरीक्षक कार्यालयासह पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली आहे. फसवणुकीची व्याप्ती मोठी असून यात कोण-कोण गुंतलेले आहेत याच्या मुळापर्यंत पोहचोण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.
--इन्फो--
नोंदणी प्रक्रियेची केली चौकशी?
दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी प्रक्रिया आणि दस्त तपासणीचे कामकाज कसे चालते याविषयीची माहिती पोलिसांनी घेतल्याचे बोलले जात आहे. कार्यालयीन कामकाजात माेठ्या प्रमाणात बाह्य व्यक्तींचा हस्तक्षेप आढळून आल्याचेदेखील समजते. कार्यालयातील एकूणच नियाेजन आणि विस्कळीत कामकाज संशयास्पद असल्याचा जाब काही अधिकाऱ्यांना विचारण्यात आला.