नाशिक : महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील खऱ्या लाभार्थींना वंचित न ठेवता तत्काळ सदनिका ताब्यात द्याव्यात आणि बोगस लाभार्थींची यादी तयार करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी दिले.स्थायी समितीच्या सभेत घरकुल योजनेवर वादळी चर्चा झडली. शेख रशिदा यांनी वडाळा येथील सावित्रीबाई फुले झोपडपट्टीतील खऱ्या लाभार्थींना सदनिका देण्यात आल्या नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी सदर झोपडपट्टीतील लाभार्थींसाठी चार महिन्यांपूर्वीच २१८ घरांची सोडत काढण्यात आली. त्यातील १२५ लाभार्थींनी पैसे भरल्याने त्यांना चाव्या प्रदान करण्यात आल्या. उर्वरित लाभार्थींसाठी लवकरच सोडत काढण्यात येणार असल्याचेही बहिरम यांनी सांगितले. यावेळी दिनकर पाटील यांनी महापालिकेने १६ हजार घरकुलांचा आराखडा तयार केला असताना ७३४० घरकुलेच कशी बांधली जात असल्याचा सवाल उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करण्याचीही मागणी केली. यावेळी शहर अभियंता सुनील खुने यांनी सर्व्हे न करताच १६ हजार घरकुलांचा पाठविलेला प्रस्ताव, ठिकठिकाणी झालेला विरोध आणि जागेबाबत आलेल्या अडचणी असा सारा इतिहास कथन केला. यावेळी दिनकर पाटील आणि सुनील खुने यांच्यात शाब्दिक चकमकही झडली.
बोगस लाभार्थींवर गुन्हे दाखल होणार
By admin | Published: May 13, 2016 10:41 PM