नाशिक : विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलिस कर्मचा-यास मदत करून पोलीस खात्यातून काढून देणार नाही या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणा-या शहर पोलीस आयुक्तालयातील वरीष्ठ लिपीक अनिल पुंडलिक माळी (५५, रा.२, सी विंग, अर्णव सोसायटी, त्रिकोणी बंगल्याजवळ, हिरावाडी, पंचवटी) यास मंगळवारी (दि़२७) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
शहर पोलीस आयुक्तालयातील ३२ वर्षीय पोलीस कर्मचा-याची विभागीय चौकशी सुरू आहे़ या चौकशीच्या कामात मदत तसेच खात्यातून काढून टाकणार नाही असा आदेश काढून देण्याच्या मोबाईल्यात माळी याने सोमवारी (दि़२६) लाचेच्या स्वरुपात १५ हजार रुपयांची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सापळा लावला होता़
पोलीस आयुक्तालयातील कॅन्टीन शेजारील टॉयलेटमध्ये तक्रारदाराकडून लाचेची १५ हजार रुपयांची रक्कम घेताच वरीष्ठ लिपीक अनिल माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहाथ पकडले़ लिपीक माळी यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी अटक केली असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलीस आयुक्तालयात शांततालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस आयुक्तालयात सापळा टाकून कारवाई केली़ या कारवाईनंतर पूर्ण पोलीस आयुक्तालयात शांतता पसरली होती़ तसेच बहुतांशी अधिकारी व कर्मचारीही फोन उचलत नसल्याचे चित्र होते़