नाशिक : चोरीच्या गुन्ह्यातील एका संशयित आरोपीने बेसिनमध्ये तोंड धुण्याचा बनाव करत कर्तव्यावर असलेल्या पोलिसाच्या हाताला झटका देत द्वारका पोलीस चौकीमधून धूम ठोकली. बुधवारी (दि. २२) सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या संशयित आरोपीला मुंबईनाका पोलिसांकडून काही दिवसांपूर्वी गुन्ह्याच्या तपासात बेड्या ठाेकण्यात आल्या होत्या.
चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या दोघा संशयित आरोपींना गुन्ह्याच्या तपासाकरिता मुंबईनाका पोलिसांनी आणत न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर या दोघांना पोलिसांनी द्वारका पोलीस चौकीत नेले. यावेळी अमोल ऊर्फ बंटी वसंत साळुंके (वय ३५, रा. पाथर्डी गाव) याने तोंड धुण्याचा बनाव केला. बेसिनमध्ये तोंड धुण्यासाठी तो उठला असता पोलिसांनी त्याची बेडी खोलली. तोंड धूत पोलिसांच्या डोळ्यांत धूळफेक करत अमोल याने थेट पोलीस चाैकीतून पोबारा केला. या घटनेमुळे मुंबईनाका पोलिसांसह गुन्हे शोध पथक, गुन्हा शाखा युनिटच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.
संशयित आरोपी लियाकत ऊर्फ अली तकदीर शहा व अमोल साळुंके यांना मुंबईनाका पोलिसांनी अटक केली होती. मध्यवर्ती कारागृहातून या दोघांचा पोलिसांनी एका गुन्ह्याच्या तपासाकरिता मंगळवारी ताबा घेतला. या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान, तपासकामासाठी द्वारका येथील पोलीस चौकीत या दोघांना मुंबईनाका पोलिसांकडून आणण्यात आले होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील रोहकले यांनी दिली आहे. पोलिसांनी त्वरित संशयित आरोपीच्या शोधार्थ तपासचक्रे गतिमान केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत फरार अमोल पोलिसांच्या हाती लागलेला नव्हता. त्याच्याविरुद्ध मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.