नाशिक : गत दोन महिन्यात एक-दोन नव्हे तर तब्बल सहा खुनांच्या घटना पंचवटी परिसरात घडल्या असून, पोलिसांचा वचक कमी झाल्याचाच हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचवटीत गुन्हेगारी टोळ्यांचे वर्चस्व वाढत चालल्याने आगामी कालावधीत या टोळ्यांचा उपद्रव वाढण्याची शक्यता आहे़ या टोळ्यांच्या आपसातील वर्चस्व वादातून हाणामाऱ्या तसेच गंभीर गुन्ह्यांच्या घटना यापूर्वीही घडल्या असून, यामध्ये आगामी काळात आणखी वाढ होण्याची अशी भीती नागरिकांमध्ये आहे़ विशेष म्हणजे गुन्हेगारी टोळके डोके वर काढत असूनही पोलीस 'दंडुका' फिरवत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
फुलेनगर येथे कौटुंबिक वादातून मामांनी भाच्याचा केलेला खून, रामवाडीत पूर्ववैमनस्यातून युवकाची हत्या, कालिकानगर येथे प्रेयसीसह तिची मुलगी व नातीला जिवंत जाळून ठार केल्याची घटना तसेच बुधवारी फुलेनगर पाण्याच्या पाटाजवळ मोबाइलचोर गुन्हेगाराचा धारदार हत्याराने केलेला खून या सहा घटना अवघ्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीत घडल्या आहेत़ यामध्ये दोन दिवसांपूर्वीच्या खुनातील संशयित वगळता अन्य घटनेतील संशयितांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पंचवटी परिसरात काही महिन्यांपासून गुन्हेगारी टोळीशी संबंधित असलेल्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. या टोळीतील संशयितांमध्ये अनेकदा वर्चस्व वादातून वाद-विवाद होतात़, तर काहीजण परिसरात दहशत माजविण्याचा हेतूने वाहनांची जाळपोळ, विनाकारण वाद, हाणामाºया यासारखे कृत्य करतात. गुन्हेगारी टोळके तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले संशयित यांच्यावर पोलिसांचा वचक कमी झाल्याने हे संशयित पुन्हा दहशत माजवतात़ विशेष म्हणजे पोलीस प्रशासन यापासून अनभिज्ञ असल्याचे दाखविते. परिसरातील वाढती गुन्हेगारी व गुन्हेगारी टोळ्यांनी पोलिसांनाच आव्हान दिले असून, या गुन्हेगारांवर दंडुका फिरवण्याची वेळ आली आहे.