मालेगाव : येथील महापालिकेच्या मोसमपूल प्रभाग कार्यालयात दिलेल्या अर्जावर कारवाई करावी, या मागणीसाठी वाद घालणाऱ्या राजेंद्र सूर्यवंशी यांच्यावर येथील छावणी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे यांनी तक्रार दिली. या प्रकरणी सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार मनपाने सूर्यवंशी आज सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास प्रभाग कार्यालयात आले. दिलेल्या तक्रार अर्जावर काय कारवाई झाली, असे त्यांनी विचारले असता त्यांना अनधिकृत नळ मोहीम व अतिक्रमण मोहीम यामुळे पुढील कारवाई प्रलंबित आहे, असे सांगितले. त्यांनी आजच्या आज कारवाई करावी, अशी मागणी केली असता त्यांना आयुक्तांच्या आदेशाने सुरू असलेल्या मोहिमेसाठी जाणे आवश्यक असल्याचे सांगितले म्हणून त्यांनी वाद घातला. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सूर्यवंशी यांनी परवानगी न घेताच लॉन्स बांधकाम केले आहे. याविरोधात परिसरातील रहिवाशांनी हे काम पाडण्याची मागणी तक्रारी अर्ज दिला होता. त्यावर त्यांना हे बांधकाम २४ तासात पाडण्याची नोटीस काही महिन्यांपूर्वी दिली होती. त्यावर त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे. त्यानंतर त्यांनी वरिष्ठ न्यायालयात दावा दाखल केला आहे. दरम्यान, सूर्यवंशी यांनी या नागरिकांविरोधात रहिवाशांचे अनधिकृत बांधकाम असल्याचा अर्ज ३ डिसेंबर रोजी प्रभाग कार्यालयात दिला होता. हा अर्ज ९ डिसेंबरला नगररचना विभागाकडे पाठवून अहवाल मागविण्यात आला आहे. यावर नगररचना विभागाने १२ जानेवारीला अहवाल दिला आहे.या अहवालाप्रमाणे या रहिवाशांना काही भाग अनधिकृत असल्याने २०७ प्रमाणे नोटीस देण्याचे काम बाकी आहे. सूर्यवंशी यांनी यापूर्वी त्यांच्या बाजार समितीच्या गाळ्याचे अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकाबरोबरही वाद घालत इतरांना फूस दिल्याचे सोनवणे यांनी सांगितले.महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर नेहमीच दादागिरी केली जात असते. यात राजकीय पक्षाबरोबरच अराजकीय व्यक्तींचा समावेश आहे. याविषयी कोणतीही कडक कारवाई केली जात नसल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. यात काहीवेळा अधिकाऱ्यांच्याही चुका असतात हा भाग अपवाद सोडल्यास अनेकवेळा अनधिकृत कामासाठी काही अधिकारी राजी नसल्यास त्यांना शिवीगाळ करणे दमबाजी करणे हे प्रकार नित्याचेच आहेत. यातील उदाहरण म्हणजे येथील शासनाचे नगररचनाकार यांना शिवीगाळ केल्याने त्यांनी अनेक दिवस रजेवर राहणे पसंत केले होते. तसेच येथील विद्युत विभागात केलेल्या तोडफोड प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागितली असता तत्कालीन आयुक्तांनी ती नाकारली आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी काम करण्यास टाळाटाळ करतात. (प्रतिनिधी)
मनपाच्या प्रभाग कार्यालयात वाद घालणाऱ्यावर गुन्हा
By admin | Published: February 10, 2016 12:09 AM