पंचवटी : नाशिक शहरात सुरू करण्यात आलेल्या गुन्हेगार सुधार योजनेच्या माध्यमातून गुन्हेगारांना गुन्हेगारी पासून दूर करण्यासाठी प्रयत्न होत असून, यात यश मिळाले तर आगामी काळात ही मोहीम देशभरात मोठी चळवळ ठरू शकेल, असा विश्वास पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी व्यक्त केला आहे.
गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शुक्रवारी (दि.२५) पंचवटी व भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगार सुधार मेळावा घेण्यात आला. यावेळी पंचवटी, आडगाव म्हसरूळ पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील ७० हून अधिक गुन्हेगार उपस्थित होते. तर भद्रकालीतील मेळाव्यात भद्रकाली, मुंबईनाका,सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार उपस्थित होते. या सर्वांना सुधारण्याची संधी दिली जात असून, विविध ठिकाणी नोकरी संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. धनदाई लॉन्स येथे शुक्रवारी घेण्यात आलेल्या गुन्हेगार सुधार मेळाव्यात पोलीस उपायुक्त संजय बारकुंड, गुन्हा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, आडगाव वरिष्ठ पोलीस निरीक्षक इरफान शेख, म्हसरूळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, ज्येष्ठ पत्रकार चंदूलाल शहा, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे संदीप गायकवाड, उद्योजक धनंजय बेळे, संमोहन तज्ज्ञ शैलेंद्र गायकवाड, मनोविकार तज्ज्ञ मुक्तेश्वर दौंड उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक पोलीस आयुक्त मधुकर गावित यांनी तर सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक उमा गवळी यांनी केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी आभार मानले.
===Photopath===
250621\25nsk_22_25062021_13.jpg
===Caption===
गुन्हेगार सुधार मेळाव्यात मार्गदर्शन करताना पोलीसआयुक्त दीपक पांडे. समवेत संजय बारकुंड, मधुकर गावित, आनंद वाघ, अशोक भगत, इरफान शेख, पंढरीनाथ ढोकणे, चंदूलाल शहा आदी.