नाशिक : राजकीय क्षेत्रातील गुन्हेगारीकरणाची चर्चा नेहमी होत असली तरी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे कामही मतदारच करीत असतात़ अर्थात अशा उमेदवारांची पार्श्वभूमी मतदारांना माहिती असतेच असे नाही़ येत्या महापालिका निवडणुकांमध्ये उमेदवारी करणाऱ्या उमेदवारांचे वर्तन, चारित्र्य व गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती मागेल त्याला उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनमध्ये राबविला जात आहे़ राज्यातील हा पहिलाच उपक्रम असून विशेष म्हणजे माहिती मागविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे़नाशिक महापालिकेची निवडणूक निर्भीडपणे व्हावी यासाठी पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल प्रयत्नशील आहेत़ मतदान करताना नागरिकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असू नये़ तसेच मतदारांना लोकप्रतिनिधीचे चारित्र्य वा गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असावी यासाठी परिमंडळ दोनमध्ये अनोखा उपक्रम राबविला जात आहे़ त्यानुसार नाशिकरोड, उपनगर, देवळाली कॅम्प, इंदिरानगर, अंबड, सातपूर या पोलीस ठाणे हद्दीतील रहिवासी व उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांची कुंडली (चारित्र्य, वर्तन, गुन्हे) तयार असून नागरिकांनी मागणी केल्यास ती तत्काळ दिली जाणार आहे़ शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनमधील पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माहिती मागणाऱ्याच्या नावाबाबत पूर्णत: गुप्तता पाळली जाणार आहे़ (प्रतिनिधी)
गुन्हेगार उमेदवारांचे रेकॉर्ड खुले
By admin | Published: February 09, 2017 12:33 AM