इंदिरानगर : महानगरपालिका पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाच्या वतीने भद्रकाली येथील दूधबाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापराविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून, एका दुकानदाराने कारवाईसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पंचवीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, प्लॅस्टिकच्या किरकोळ विषयासाठी थेट फौजदारी कारवाईचे पाऊल उचलण्यात आल्याने व्यापारी वर्गात तीव्र संतप्त भावना व्यक्त होत आहेत.महानगरपालिकेने स्वच्छ शहर अभियानाअंतर्गत पहिल्या दहामध्ये येण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्यामुळेच आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दोनच दिवसांपूर्वी सर्व विभागीय अधिकाºयांची बैठक घेऊन प्लॅस्टिक बंदीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. इतकेच नव्हे तर हातात प्लॅस्टिकची पिशवी दिसली तरी संबंधितांकडून पाच हजार रुपयांचा दंड वसूल करावा आणि कारवाईस विरोध झाला तर तत्काळ सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले. त्यामुळे आता बाजारपेठांमध्ये फिरून मनपाचे कर्मचारी कारवाई करीत आहेत.गुरुवारी (दि.२२) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पूर्व विभागीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने भद्रकाली दूधबाजारात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºया दूध व्यावसायिकाविरुद्ध धडक मोहीम राबविली गेली. त्यावेळी काही व्यावसायिकांनी अधिकारी आणि कर्मचाºयांच्या अंगावर धावून जाऊन कारवाईला विरोध केला. त्यामुळे तातडीने भद्रकाली पोलीस स्टेशनला खबर दिली असता, पोलिसांनी दोघा संशयित आरोपींविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले. त्याचबरोबर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºया व्यावसायिकांकडून २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विभागीय अधिकारी राजेंद्र धारणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ, शिवाजी काळे, बोडके आदींनी सदर मोहीम राबवली.या प्रकारामुळे व्यापारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. किरकोळ कारणासाठी गंभीर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार अश्लाघ्य असल्याच्या भावना व्यापारी वर्गाने व्यक्त केल्या आहेत.मनपाचे कर्मचारी कारवाईच्या नावाखाली व्यापारी वर्गाला त्रास देत असून, अनेक ठिकाणी अनधिकृत वसुलीच्या तक्रारी आहेत. प्रशासन जर इतके जागरूक असेल तर मग शहरात प्लॅस्टिकच्या पिशव्या आल्याच कशा ?- निवास मोरे, हॉटेल व्यावसायिक, अशोकस्तंभ
प्लॅस्टिक कारवाईस विरोध करणाऱ्यांवर फौजदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 1:06 AM