संदीप चकोर निफाडतालुक्यात पिण्याच्या पाण्याची आज जरी तितकीशी टंचाई नसली तरी लवकरच टंचाईची समस्या भासू शकते, अशी एकूणच धरणांची अवस्था बघितल्यास दिसून येते. निफाड तालुक्यात यावर्षी अद्यापपर्यंत एकही टँकर चालू नसून नवीन एकाही गावातून टँकरची मागणी आली नसल्याची माहिती निफाडच्या गटविकास अधिकारी वैशाली रसाळ यांनी दिली.निफाड तालुक्यात एकूण १३५ गावे असून, या तालुक्याची लोकसंख्या ४,९३,२५१ एवढी आहे. मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात पाऊस चांगला झाल्याने अजूनतरी पिण्याच्या पाण्याबाबत या तालुक्यात गंभीर समस्या निर्माण झालेली नाही. पाणीटंचाई कृती आराखड्याचा पहिला टप्पा आॅक्टोम्बर ते डिसेंबर आणि दुसरा टप्पा जानेवारी ते मार्च असा असतो. या दोन्ही टप्प्यात या तालुक्यातून एकही टँकरची मागणी आलेली नाही. मात्र एप्रिलमध्ये तालुक्याच्या उत्तर भागातील तळवाडे या गावातून कूपनलिका अधिग्रहण करण्याबाबतचा प्रस्ताव जि. प. लघु पाटबंधारे विभागाकडे आलेला आहे. पाणीटंचाई कृती आराखडा हा एप्रिल ते जून यादरम्यानसाठी तयार करण्यात आला असून, या तिसऱ्या टप्प्यात या तालुक्यात १८ गावांत आणि दोन वाड्यांत विहीर अधिग्रहण करणे आणि १४ गावे व सहा वाडी-वस्तीत टँकरने पाणीपुरवठा करणे अशी कामे प्रस्तावित आहेत.मागील वर्षी या तालुक्यात जलयुक्त शिवाराची ३३ कामे झालेली आहेत. गोदाकाठच्या महाजनपूर, पिंपळगाव निपाणी, भेंडाळी, औरंगपूर, तळवाडे या गावांत सीमेंट बंधारे, तलाव बांधणे, तलावातील गाळ काढणे व इतर कामे करण्यात आली होती. शिवाय काही नद्यांमधील गाळ शासन आणि लोकसहभागातून काढण्यात आला होता. या कामाचा नक्कीच बऱ्यापैकी फायदा शेतकऱ्यांना झाला. मात्र यावर्षी या बंधारे आणि तलावातील पाणी पूर्ण आटून गेले आहे. या तालुक्यात मागील वर्षी जरी शेवटच्या टप्प्यात जोरदार पाऊस झाला व नद्यांना पूर आले तरी तो पाऊस मुसळधार वेगाने असल्याने पावसाचे पाणी जमिनीवरून जादा प्रमाणात वाहून गेले व जमिनीत कमी मुरले. त्यामुळे या तालुक्यात यावर्षी काही गावांत फेब्रुवारी महिन्यात जमिनीत भूजल पातळी खाली गेल्याने शेतकऱ्यांनी बोअरवेल करायला सुरु वात केली आहे, तर काहींनी विहिरी खोल करण्याची कामे हाती घेतली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये पाणीटंचाईची खरी स्थिती समोर येईल. कारण मागील वर्षी जुलै महिन्यात या तालुक्यातील २० गावांत २८ टँकर चालू होते. विशेष म्हणजे, २० पैकी १६ गावे ही तालुक्याच्या पूर्व भागातील, तर चार गावे दक्षिण, गोदाकाठ भागातील होती. विशेष म्हणजे, २०१६ पूर्वी या तालुक्यात दरवर्षी उन्हाळ्यात ३ ते ५ टँकरची मागणी असायची. यावर्षी एप्रिल, मेमध्ये भूजल पातळीवर किती परिणाम होतो यावर प्रशासनाला लक्ष ठेवून पिण्याच्या पाण्याबाबत दक्ष राहून नियोजन करावे लागेल.
नांदूरमधमेश्वर बंधारा आटल्याने संकट
By admin | Published: April 25, 2017 1:21 AM