अभोणा : जुलै महिना सुरू झाला, तरी अध्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या ८ टक्के पेरण्याही पावसाअभावी उलटण्याचा धोका असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.जूनच्या सुरुवातीला पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली. मात्र, पुढे महिनाभर पावसाने अवकृपा दाखविली. त्यामुळे खरिपाचे नियोजन पुरते कोलमडल्याची स्थिती आहे. अंकुरलेली पिके कोमेजू लागली आहेत. दुसरीकडे कृषी विभागाकडून ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. येत्या काळात पाऊस न झाल्यास दुबार पेरणी करण्याची पाळी येऊ शकते, तर समाधानकारक पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या कधी होतील, याची काळजी शेतकऱ्यांना आहे, तर दुसरीकडे यावेळी महागडे बियाणे पेरण्यास शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही. त्यामुळेही पेरण्या रखडलेल्या आहेत. सध्याच्या कोरोना काळात शेतकरी विविध संकटांचा सामना करीत असून, आर्थिक समस्येला त्याला तोंड द्यावे लागत आहे.दरम्यान, पावसाने ओढ दिल्याने तालुक्यासह संपूर्ण कसमापट्टा, तसेच खान्देशास पाण्यासाठी वरदान ठरणाऱ्या चणकापूर (१६ टक्के) व पुनंद (१४ टक्के) प्रकल्पात आजअखेर पाणीसाठा आहे. तालुक्यातील धनोली, भेगू, गोबापूर, माळेगाव, बोरदैवत, मार्कंडपिंप्री, धार्डे दिगर, खिराड, ओतुर, भांडणे, जामलेवणी, नांदूरी हे लघुसिंचन प्रकल्प अध्यापही कोरडेच आहेत. तालुक्याचे खरीप सर्वसाधारण क्षेत्र ४६,२४१ हेक्टर असून, यंदा जूनअखेर ३,६६० हेक्टरवर (८ टक्के) पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच सुमारास ७१ टक्के पेरणी झाली होती.तालुक्याचे पर्जन्यमान ६३५ मिमी. असून, जून, २०२० अखेर १५९ मिमी पाऊस झाला होता. यंदा मात्र जूनअखेर ५६.२ मिमी पाऊस झाला आहे.पाऊस नसल्यामुळे टोमॅटो, मिरची व इतर भाजीपाला अशा पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. पाऊस लांबल्यास सोयाबीन, मका, उडीद, मूग ही पिकेही धोक्यात येतील.- योगेश पाटील, शेतकरी, दह्याणे, ता. कळवण.
पावसाने ओढ दिल्याने संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2021 12:02 AM
अभोणा : जुलै महिना सुरू झाला, तरी अध्यापही तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या ८ टक्के पेरण्याही पावसाअभावी उलटण्याचा धोका असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.
ठळक मुद्देपेरण्या धोक्यात : कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आव्हान