देवळा तालुक्यातील पूर्व भागातील मेशीसह डोंगरगाव परिसरात अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झालेला नाही त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे. या वर्षी पावसाळा लवकर म्हणजेच मे महिन्यात सुरू झाला आहे. मे महिन्यात बदललेल्या वातावरणाचा पाऊस होता. त्या पावसावर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली मात्र त्यानंतर पावसाने मोठी ओढ दिली. परंतु ऐनवेळी रिमझीम पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले. रिमझिम पावसाने पिकांना जीवदान तर मिळालेच शिवाय खुंटलेली वाढ जोमाने होऊ लागली. खरिपात मका, बाजरी, भुईमूग, मूग, तूर याबरोबरच काही प्रमाणात सोयाबीनची लागवड आणि पेरणी केली आहे. मात्र अत्यल्प पावसाने पावसाळी कांदा लागवड रोडावली आहे. याचबरोबर जोरदार पाऊस नसल्याने विहिरीतील पाणी पातळी खोलवर गेली आहे. नदी, नाले, पाझरतलाव कोरडेठाक आहेत. सध्या अधूनमधून पावसाचा शिडकावा होत आहे. अधूनमधून जोरदार वारा सुरू आहेत परंतु त्यामुळे बळीराजा कमालीचा धास्तावला आहे. आगामी काळातील सर्व नियोजन कोलमडले आहे. जवळपास पावसाळ्याचे दोन महिने लोटले आहेत परंतु अद्यापपर्यंत जोरदार पाऊस झालेला नाही. मागील वर्षी याउलट चित्र होते. सध्या शेतकरी वर्गाचे डोळे आकाशाकडे लागले असून सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दुबार पेरणीचे संकट टळले, नदी-नाले मात्र कोरडेच राहिले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:15 AM