नाशिक : शहरासह जिल्ह्याला ऑगस्टपर्यंत पुरू शकतो इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाणीसाठ्याचा योग्य व्यवस्थापन नाशिक जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नाशिककरांनी विशेषत: शहरी भागात पाण्याचा विनाकारण होणारा अपव्यय टाळवा, जेणेकरून पाणीकपातीचे संकट जुन अगोदर ओढावणार नाही, असे जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे म्हणाले. नाशिक शहरात सध्यातरी पाणीकपात करण्याची गरज वाटत नाही, असे त्यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात दादा भुसे यांनी पाणीटंचाईबाबत नियोजन व व्यवस्थापन आढावा बैठक सोमवारी (दि.८) दुपारी चार वाजता घेतली. यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, पाणीपुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता चव्हाणके, मालेगाव महापालिकेचे आयुक्त भालचंद्र गोसावी आदि अधिकारी उपस्थित होते.
जून व जुलैमध्ये जिल्ह्यात कमी पाऊस पडण्याची श्यक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. यंदा एल निनोचा अधिक प्रभाव राहणार असून मान्सून लांबणीवर जाण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. यामुळे आतापासून शासनाच्या आदेशानुसार पाणी व्यवस्थापन व नियोजनावर भर दिला जात आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याची तहान भागेल इतका पाणीसाठी धरणांमध्ये सध्या उपलब्ध आहे; मात्र उन्हाचा तडाखा आगामी दिवसांत वाढल्यास वेगाने बाष्पीभवनही होऊ शकते. यामुळे पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची व सरकारी यंत्रणांचीसुद्धा जबाबदारी असल्याचे भुसे यांनी सांगितले.
पाण्याचा विनाकारण अपव्यय कोठे होणार नाही, याबाबत अधिकाधिक सतर्क राहण्याची सुचना जिल्हा परिषदेसह नाशिक महापालिका, मालेगाव महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे....तर एक दिवस पाणीकपात!
पाऊस लांबणीवर गेला किंवा दोन पावसांमध्ये खंड पडत असल्याचे चिन्हे दिसल्यास उपलब्ध पाणीसाठा व वापराची गरज लक्षात घेता त्यावेळी नाशिक महापालिकेकडून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली जाऊ शकते; मात्र हे करताना नाशिककरांना पुर्वकल्पना देऊन विश्वासात घेतले जाईल, असेही भुसे यांनी यावेळी स्पष्ट केले.