नाशिक : रायगडनगर ते वाडीवऱ्हे दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रानमाळावर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी व व्यापारी यांच्या संगनमताने कृषी मालाचा पर्यायी बाजार सुरू झाला असून, परिसरातील पाथर्डी, गौळाणे, राजूर, आंबेबहुला, दहेगाव, गोंदे दुमाला आदी भागांतून याठिकाणी अनेक शेतकरी त्यांचा कृषिमाल विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहरातील विविध भागांतील किरकोळ विक्रेत्यांनाही व्यवसायात अडचणी येत असल्याने त्यांनीही महामार्गालगतच्या माळरानावर दुकाने लावली असून, शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या परस्पर सहकार्यातून कोरोनाच्या संकटावर तोडगा काढण्यासाठी या भागात पर्याय बाजार उभार राहिला आहे.नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर याठिकाणच्या व्यवहारांवर निर्बंध आले होते. त्यामुळे पाथर्डी, विल्होळी, राजूर, आंबेबहुला, रायगडनगर, वाडिवऱ्हे परिसरांतील शेतकऱ्यांनी थेट महामार्गावर शेतमालाची विक्री सुरू केली होती. या ठिकाणच्या व्यवहारांना बाजाराचे स्वरूप येऊन मोठ्या प्रमाणात कृषी मालाची उलाढाल होऊ लागली असून, शेतक ºयांनाही कृषी उत्पन्न बाजार समितीला पर्याय मिळाला आहे. विशेष म्हणजे बाजार सुरू करताना शेतकरी व व्यापाऱ्यांना पोलिसांच्या कारवाईचाही सामना करावा लागला. परंतु, मोकळ्या माळरानावर शेतकऱ्यांनी परस्परांमध्ये अधिक अंतर राखून व्यवहार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथे येणाऱ्या व्यापाऱ्यांचे प्रमाणही वाढले असून, येथे रोख स्वरूपातील कृषिमाल खरेदी विक्रीचे व्यवाहार मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत.
शेतकऱ्यांवर कारवाई, पर्यटकांकडे कानाडोळा गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत काही प्रमाणात पालेभाज्या आवक घटल्याने पालेभाज्याही महागल्या होत्या. तर दुसरीकडे शेतातील पिकांचे बाजार उपलब्ध होत नसल्याने नुकसान होत होते. त्यामुळे शेतकरी अशा पर्यायी ठिकाणांवर कृषी मालाची विक्री करण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शेतमालाची विक्री कशी करावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे याच भागातील टेकड्यांवर श्रावणसरींनी पसरलेल्या हिरवळीवर सहलीचा आनंद घेणाºया पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यांच्याकडे मात्र पोलिसांकडून कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे रायगडनगर समोरील टेकडी लष्करी हद्दीला लागून असतानाही या ठिकाणी साप्ताहिक सुटीच्या दिवशी शहरवासीयांचे अक्षरश: लोंढेच येत असताना स्थानिक पोलिसांचे त्याक डे मात्र दुर्लक्ष होत आहे.