गेल्यावर्षी काेरोनाचे संकट आल्यानंतर सुरुवातीला अनेक जण रुग्णालयात दाखल होण्याच्या कल्पनेेनेच धास्तावले होते. अनेकांना तर लक्षणेही कळत नसल्याने घरच्या घरीच उपचार घेऊन गृहविलगीकरणातच राहाणे पसंत करत होते. नंतर मात्र अनेक जण त्यासाठी रुग्णालयातदेखील जाऊ लागले. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत कमी झाली आणि फेब्रुवारीपासून हळूहळू रुग्ण वाढू लागले असले तरी त्यानंतर सुरुवातीला गृहविलगीकरणातील रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र नंतर ही संख्या वाढू लागली. त्यानंतर पुन्हा रुग्णालये फुल्ल झाली. आता किरकोळ लक्षणे किंवा एचआरसीटी स्कोर कमी असल्याचे सांगून रुग्ण घरीच राहातात आणि नंतर प्रकृती गंभीर झाल्यानंतर रुग्णालयात दाखल होण्यासाठी धावपळ सुरू करतात. त्यामुळेही अनेकांच्या जिवावर बेतते. तथापि, हे प्रमाण फार नसून साधारणत: दोन टक्के असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे.
इन्फो....
घरच्या घरीच उपचार
काही बाधित घरीच उपचार घेणे पसंत करतात. रुग्णालयातील एकूण गर्दी आणि अन्य प्रकार बघता घरीच उपचार केलेले बरे असे काहींचे म्हणणे असते तर काहींचा त्यांच्या परिचित डॉक्टरांवर विश्वास असतो. त्यामुळेदेखील घरीच बरे होऊ, असा अनेकांना विश्वास असतो. काही रुग्ण घरी बरे होतातही, परंतु सर्वांच्याच बाबतीत असे घडत नाही.
इन्फो..
गृहविलगीकरणातील संख्या अधिक
गेल्यावर्षीपेक्षा यंंदा गृहविलगीकरणात राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेल्यावर्षी कोरोनाची भीती होती आणि विषाणूविषयी पुरेशी माहिती नसल्याने बाधित रुग्णालयात चटकन दाखल होत आता मात्र आधी ॲंटिजेन चाचणी मग आरटीपीसीआर, स्कॅनिंग, एचआरसीटी स्कोर अशा अनेक चाचण्या करून रुग्णांना दाखल होण्याबाबत सल्ला दिला जातो कित्येकदा रुग्णही दाखल होत नाहीत.
इन्फो...
कारणे काय?
यापूर्वी काही कारणांनी रुग्ण गृहविलगीकरणात घरीच राहात असले तरी सध्या तरी दाेन कारणांमुळे बाधित गृहविलगीकरणात राहाणे पसंत करतात. रुग्णालयात बेड मिळत नाही हे सर्वात महत्त्वाचे कारण तसेच बिल खूप येते ते परवडणार नाही म्हणून घरीच राहाणे पसंत करतात. दुसरी बाब कोरोना संसर्गाबाबत जागृती झाल्याने केव्हा उपचारासाठी दाखल व्हायचे हे रुग्ण ठरवतात.
इन्फो...
दोन टक्के रुग्णांचा घरीच मृत्यू
नाशिक शहरातील दोन टक्के रुग्णांचा घरीच मृत्यू झाल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. महापालिकेच्या वतीने कितीही नाकारण्यात आले असले तरी अनेक रुग्णांचा तर केवळ बेड मिळत नसल्याने मृत्यू झाल्याची नोंद आहे. अर्थात अशाप्रकारची शक्यता महापालिका नाकारता नसली तरी अलीकडच्या काळात अशा दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे महापालिकेच्या सूत्रांनी सांगितले.
कोट....
शहरात गृहविलगीकरणात राहण्याचे प्रमाण अधिक असले तरी घरी राहिल्याने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे. बेड मिळाले नसल्यानेच मृत्यू झाले असे म्हणता येणार नाही. अनेक ठिकाणी रुग्ण घरीच उपचार घेतात आणि प्रकृती गंभीर झाल्यानंतर उपचारासाठी धावपळ करतात.
- डॉ. बापुसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका