इगतपुरी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १६) पोलिसांना चकमा देत गनिमी काव्याने आंदोलन छेडत कसारा घाटात दुधाचा टॅँकर अडविण्यात आला. यावेळी पोलिसांनी धाव घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटकाव करत ताब्यात घेतले. पदाधिकाºयांनी शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने टोल नाक्यावर आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र, पोलिसांची कुमक लक्षात घेऊन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडघुले, महानगरप्रमुख नितीन रोठे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष नाना बच्छाव व दीपक पगार यांच्यासह कार्यकर्त्यांनी गनिमी कावा खेळत पोलिसांना चकवा देत कसारा घाटात दुधाचा टॅँकर अडविला. पोलिसांना खबर मिळताच त्यांनी सदर पदाधिकाºयांना अटकाव करत ताब्यात घेतले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र शासनाचा निषेध असो, दुधाला हमीभाव मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पोलिसांची मोठी कुमक नाशिक व ठाणे जिल्ह्यातून मागविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
कसारा घाटात अडवला दुधाचा टँकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 1:45 AM